पांझरा नदीकाठावरील धुळे, शिंदखेडा आणि अमळनेर तालुक्यातील गावांसाठी अक्कलपाडा प्रकल्पात पाणी आरक्षित असल्याने प्रकल्पातून ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शहरातून वाहणारी पांझरा नदी पुन्हा प्रवाहित होणार आहे. तीन दिवसात अक्कलपाडय़ाचे पाणी शहरापर्यंत येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
जिल्ह्यातील अक्कलपाडा, मांडळ आणि अनेर धरणात पिण्यासाठी पाणी आरक्षित आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जातो. दरवर्षी डिसेंबर अथवा जानेवारीत अक्कलपाडा प्रकल्पातील आरक्षित पाण्याचे पहिले आवर्तन सोडले जाते. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आले होते. परिणामी प्रमुख नद्या फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत प्रवाहित होत्या. तसेच विहिरींचीही जलपातळी चांगली राहिली. एप्रिलपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने अमळनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. याबाबत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला होता. अक्कलपाडा धरणातून धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील ३४ गावांसाठी ३००.५, तर अमळनेर तालुक्यातील १६ गावांसाठी ६८.५७ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित आहे.
पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा आणि पाटबंधारे विभागाला दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारी सायंकाळी अक्कलपाडय़ातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, सदस्य संग्राम पाटील, अभियंता महाले, राहुल मोरे आदी उपस्थित होते. धुळे तालुक्यातील एकाही गावात अद्याप टंचाई जाणवत नसली तरी भविष्यात ती जाणवण्याची शक्यता आहे. अमळनेर तालुक्यातील १६ आणि शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, पढावद गावांना टंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा बेटावद, पढावद, भिलाली, एकलहरे, एकतास, बाम्हणे, तांदळी आदी गावांना फायदा होणार आहे.