धुळे महापालिका निवडणूक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोष मासोळे, धुळे</strong>

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह समविचारी पक्ष-संघटनांनी मोट बांधली आहे. महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजपमध्ये उफाळून आलेली गटबाजी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही काही प्रमाणात कायमच राहील, असे गृहीतक मांडून काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. भाजपविरोधातील वातावरणाचा फायदा घेण्यासाठी अन्य पक्षही सरसावल्याने निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.

शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. राज्यातील बहुतांश नगरपालिका, जिल्हा परिषद महापालिका भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुक्त प्रवेश धोरणामुळे भाजपमध्ये आयारामांची गर्दी वाढली आहे. प्रतिस्पर्धी पक्षातील मातब्बर उमेदवारांना पक्षात घेऊन विरोधकांची राजकीय शक्ती कमी करणे, या पद्धतीनुसार भाजपचे काम सुरू आहे. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीतील नगरसेवकांना गळाला लावून त्या त्या प्रभागात अधिक कष्ट न घेता संबंधितांना निवडून आणण्याची गिरीश महाजन यांची पद्धत धुळ्यात यशस्वी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तथापि, विरोधकही तेवढय़ाच ताकदीने भाजपच्या व्यूहरचनेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी तयारीला लागले आहेत. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी गिरीश महाजन, डॉ. सुभाष भामरे, जयकुमार रावल यांच्या कार्यपद्धतीविरोधात जाहीरपणे बंड पुकारले. गोटे यांच्या नाराजीचा पक्षाला फटका बसू शकतो, हे ध्यानात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना शांत केले असले तरी काही प्रमाणात धुसफूस सुरूच राहील, हे ओळखून विरोधक उत्साहित आहेत.

महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा दावा समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, डावी लोकशाही आघाडी, एमआयएम, लोकजनशक्ती, रिपाइं, संभाजी ब्रिगेड या पक्ष-संघटनांनीही केला आहे. यासाठी या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी धुळ्यात बैठका, सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. अधिकाधिक प्रभागात उमेदवार देण्यावर त्यांचा भर आहे. ज्या प्रभागात, ज्या पक्षाचा प्रभाव आहे, त्या ठिकाणी त्याच पक्षाचा उमेदवार देण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे धोरण आहे. यामुळे भाजप, शिवसेना किंवा अन्य पक्षांना कसरत करावी लागणार आहे. अशा प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांना शह देण्याकरिता प्रभावी मुद्दे त्या त्या भागात जोरकसपणे मांडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन संभाव्य उमेदवारांची यादी पक्ष नेतृत्वाकडे पाठविली आहे. काही प्रभागांमध्ये शिवसेनेला सक्षम उमेदवार शोधतांना दमछाक करावी लागली. मुस्लीमबहुल भागात समाजवादी पक्षाने आपले बस्तान बसविले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आमदार अनिल गोटे यांच्याशी युती करण्याबाबत चर्चा झाली होती. पण त्यावर एकमत होऊ  शकले नाही. यामुळे मनसे कोणासोबत राहणार हे अनिश्चित आहे. गोटे यांच्या विकास कामांना मनसेचा पाठिंबा असला तरी तो भाजपला नाही, असे पक्षाचे महानगरप्रमुख सांगतात. किमान चार प्रभागात उमेदवार देण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. डाव्या लोकशाही आघाडीची पाच प्रभागातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. निवडणुकीत समान कार्यक्रमांवर पाठिंबा देण्याविषयी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने पत्र दिले आहे. जागावाटपात आघाडीशी चर्चा झाल्यास योग्य निर्णय घेण्याची तयारी डाव्या लोकशाही आघाडीने ठेवली आहे. भाकप, माकप, शेतकरी कामगार पक्ष, सत्यशोधक जनआंदोलन यांच्या संयुक्त डाव्या आघाडीने मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.