धुळे – मुंबईहून मंगलोर येथे जाणाऱ्या एका बसमधून लुटून चालवलेल्या तब्बल १८ लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश आलं आहे. आरोपी दागिने लुटून धुळे मार्गे मध्यप्रदेशमध्ये पसार होणार होते. यात अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा समावेश होता. मात्र, कर्नाटक पोलीस व धुळे पोलीस यांनी सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोनगीर टोल नाक्यावर सापळा रचून फिल्मी स्टाईलने आरोपींना अटक केली.

या गुन्ह्यासंदर्भात सोमवारी (२० जून) पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “१६ जून रोजी मुंबईहून मंगलोर येथे जाणाऱ्या एका खासगी बसमधून १८ लाखांचे सोन्याचे दागिने नेण्यात येत होते. कर्नाटक राज्यातील बाईंदुर पोलीस स्टेशनला हे दागिणे लूट केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

बाईंदुर पोलीस स्टेशन, कर्नाटक येथे १९/२२ भा. दं. वि. कलम ३२९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. कर्नाटक पोलिसांची टीम गाडीच्या मागावर होती. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. यानुसार मारुती कार (MP 09 W 9284) या वाहनातून कर्नाटक राज्यातील सोने चोरी प्रकरणातील टोळी धुळे मार्गे मध्यप्रदेश येथे जात होती. त्यातच कर्नाटक पोलिसांचे पथक देखील त्यांचा तपास करीत धुळ्यात आले.

या सर्व घटनेची माहिती घेऊन धुळे पोलीस, सोनगीर पोलीस व कर्नाटक पोलिसांच्या पथकांनी सोनगीर टोल नाका येथे सापळा रचला. तसेच रविवारी (१९ जून) रात्री बारा वाजेच्या सुमारास संशयित कारमधील आरोपींना टोलनाक्यावर येताच अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या अतिशय अट्टल चोरट्यांनी गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्नाटक पोलीस व धुळे पोलीस यांनी सोनगिरी पोलीस व एनसीबी पथकाच्या मदतीने फिल्मी स्टाईलने या गुन्हेगारांच्या वाहनावर झडप टाकली आणि चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा : “नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करेन, पण…”; सांगलीतील पायलटला नोएडाच्या महिलेकडून ५९ लाखांना गंडा

या झटापटीत कर्नाटक येथील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. मात्र, कर्नाटक पोलीस व धुळे पोलिसांच्या मदतीने अट्टल गुन्हेगारांना अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. यानंतर आरोपींना धुळे एलसीबी कार्यालयात आणून अट्टल गुन्हेगारांची विचारपूस करण्यात आली. त्यांनी कर्नाटक राज्यात चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्या गाडीमधून १८ लाखांचे सोने पोलिसांनी हस्तगत केले. याप्रकरणी चार आरोपींना धुळे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.