भारतात दर आठ सेकंदाला दोन लोकांना नव्याने मधुमेह होतो, तर दर ८ सेकंदानी मधुमेहामुळे दोन रुग्ण मृत्युमुखी पडतात. २०१५ साली भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनेल, अशी भीती मधुमेहावरील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली. असोसिएशन ऑफ फिजिशियन या संस्थेच्या वतीने मालवण येथे मधुमेह या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. शशांक जोशी, डॉ. शिल्पा जोशी, डॉ. विजय पनीकर, डॉ. विजय निगंनूर, डॉ. बिची निगंनूर आदींनी मार्गदर्शन केले. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. विवेक रेडकर व मालविका झांटय़े यांनी ओळख, मांडणी व स्वागत केले. मधुमेह नियमित ठेवण्यासाठी निदान करून घेतले पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. जेवणात भाताचे प्रमाण कमी ठेवले पाहिजे, असे यावेळी डॉक्टर्सनी स्पष्ट केले. जेवणात आंबा खाण्याचे प्रमाण ठेवावे तो जेवणासोबत खाऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले. मधुमेहामुळे मानवाचा मेंदू, डोळा, किडनी, हृदय, रक्तदाब, हातपायाच्या नसा व रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होत असतो. त्यासाठी नियमित तपासण्या व मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपलब्ध गुणकारी औषधांचा वापर केला पाहिजे, असे डॉक्टर्स म्हणाले. लोकांनी इन्सुलीनविषयी उगाच भीती बाळगण्याचे कारण नाही, असे डॉक्टर्स म्हणाले. मधुमेहाचे आजार आटोक्यात आणण्यासाठी योग्य तो डॉक्टरी सल्ला वेळीच घेऊन व्यायाम व आहारावर लक्ष देणे आवश्यक असते. त्यासाठी जरूर तर जनजागृती करण्यासाठी डॉक्टर्स व पेशंटसाठी लवकरात लवकर कार्यशाळा घेण्याचे सुतोवाच डॉ. विवेक रेडकर यांनी केले. डॉ. विवेक रेडकर यांनी भारत मधुमेहाची जागतिक राजधानी बनण्याची भीती व्यक्त करून चालणार नसल्याचे सांगून, सर्वाना बरोबर घेऊन जनजागृती करण्यासाठी आमचा हा पुढाकार असल्याचे बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा