वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला तत्काळ आरोग्य सेवा मिळावी, या साठी कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधी, शॉक मशीन, ऑक्सिजन सििलडर व सोबत डॉक्टर अशी सुसज्ज रुग्णवाहिका कोणत्याही वेळी केवळ १०८ क्रमांक डायल करताच दारात येऊन उभी राहील. या योजनेंतर्गत सरकारकडून जिल्ह्य़ात अशा अद्ययावत तब्बल १९ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.
बीड शहरासह ग्रामीण भागात अपघाती रुग्ण, हृदयविकाराचा धक्का, सर्पदंश, विषबाधा, जळीत रुग्ण तसेच नसर्गिक आपत्तीच्या वेळी दवाखान्यात जाण्यासाठी वाहनांची सोय नसते. काही खासगी रुग्णालये व विविध सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका असल्या, तरी वाढत्या दुर्घटनांचे प्रमाण लक्षात घेता या रुग्णवाहिका सर्वासाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिस योजना सुरू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्य़ात अद्ययावत यंत्रणा असलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. बीड जिल्ह्य़ात अशा १९ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. २४ तास ही सेवा कार्यरत असेल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी केले.