गुजरातमध्ये आज (१७ डिसेंबर) सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सरफा बाजाराचे उद्घाटन झाले. सूरत डायमंड बोर्ससाठी बांधण्यात आलेली इमारत ही जगातील सर्वांत मोठे कार्यालय ठरले आहे. यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आता सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील हिरे व्यापार सूरतला पळवून नेल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून सरकारला जाब विचारला आहे.
“पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सूरतमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या ‘डायमंड बोर्स’चं उद्घाटन झालं. याबद्दल गुजरात सरकारचं अभिनंदन करावं की मुंबईतला हिरे व्यवसाय आपल्या डोळ्यांदेखत पळवला गेला याचं दुःख व्यक्त करावं हेच समजेनासं झालंय. मुंबईतला हिरे व्यवसाय संपवून सूरतच्या हिरे व्यवसायाला ताकद दिली जात असताना आपले सत्ताधारी आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिले”, अशी टीका रोहित पवारांनी केली.
हेही वाचा >> “गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल”, सूरत डायमंड बोर्सच्या उद्घाटनात पंतप्रधानांचे वक्तव्य, म्हणाले…
“खुर्चीचा विषय असला तर दिल्लीला पन्नास चकरा मारता, दिल्लीचे पाय धरता आणि महाराष्ट्राच्या हिताचा विषय असतो तेव्हा मात्र बिळात लपून बसता, हाच का तुमचा मराठी बाणा आणि हाच का तुमचा स्वाभिमान? भाजपासाठी आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांसाठी केवळ सत्ता महत्त्वाची आहे का? महाराष्ट्राच्या अस्मितेची तुमच्या लेखी काही किंमत नाही का? अजून काय काय गहाण टाकणार? किमान महाराष्ट्रासाठी थोडा तरी स्वाभिमान दाखवा”, असंही रोहित पवार म्हणाले.
डायमंड बोर्सचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
सूरतच्या डायमंड बोर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. “आधुनिक कनेक्टिव्हिटी असणारं सूरत देशाचं एकमेव शहर आहे. याचा जास्तीत जास्त लाभ उठवा. सूरतची प्रगती झाली तर गुजरातची प्रगती होईल आणि गुजरातची प्रगती झाली तर माझ्या देशाची प्रगती होईल”, असं मोदी यावेळी म्हणाले.