सांगली : गेल्या साडेतीन दशकामध्ये आमदार आणि १७ वर्षे मंत्री असतानाही वाळवा तालुक्यातील मूलभूत प्रश्न सोडवता आले नाहीत. गावाला रस्ता, पाणी देउ शकला नाही. केवळ पै-पाहुण्यांना राजकारणात संधी देत सत्ताकेंद्र कुटुंब व पै-पाहुण्यांच्या ताब्यात ठेवून एक प्रकारची हुकुमशाही चालवली असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता रविवारी केला.
भडकंबे (ता.वाळवा) येथे रस्ते कामाच्या शुभारंभ आज पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी इस्लामपुर विधानसभा मतदार संघात आला आहे. या पुढे तालुययातील प्रत्येक घटकाला भयमुक्त करायचे आहे,केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सामान्य लोकांसाठी अनेक योजना आणल्या.या सरकारची रयतेचे सरकार म्हणून एक ओळख होऊ लागली आहे.
आणखी वाचा-ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वसंतदादा कारखान्यावर धडक
वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष निवास पाटील, जिल्हा सचिव धैर्यशील मोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण माने यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास गजानन पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. संभाजी तहप, अशोक पाटील, वसंतराव पाटील, नितीन बागणे, रणजित माने आदींसह प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.