अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम करत १३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण हे मागच्या दोन ते तीन वर्षांपासून अस्वस्थ होते. त्यांनी एका मुलाखतीत नाना पटोलेंवरही टीका केली आहे. इतकंच नाही तर नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं ही घोडचूक होती असंही वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे. भाजपात जाण्याचा निर्णय व्यक्तिगत होता, एकही आमदार संपर्कात नाही, मी कुणालाही या म्हणून सांगितलेलं नाही असंही अशोक चव्हाण म्हणाले.
दोन ते तीन वर्षांपासून अस्वस्थ
मागच्या दोन ते तीन वर्षांपासून मी अस्वस्थ आहे. राजकारण करायचं आहे. इतक्या लवकर मला राजकीय क्षेत्रातून मला बाहेर पडायचं नाही. पण घुसमट सहन करत आपण एकाच पक्षात राहण्यापेक्षा मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. कुठल्या आमदाराला मी माझ्याबरोबर ये हे सांगितलेलं नाही. भाजपात विनाअट येण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा होता. असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसंच नाना पटोले यांच्यामुळेच घुसमट वाढली हे त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी प्रत्यक्ष नाना पटोलेंचं नाव घेतलं नाही मात्र महाराष्ट्राचे अध्यक्ष हाच त्यांच्या म्हणण्याचा रोख होता. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हे पण वाचा- “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणं कठीण होत गेलं
काँग्रेसमध्ये निर्णय घेतले गेले, राजकीय ठराव केले गेले. तर त्याची अंमलबजावणीच होत नसेल? तर काय करणार? मी व्यक्तिगत दोष कुणाला देणार नाही. पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा हे किती काळ चालणार? हे मला पटलं नाही म्हणून मी शेवटी वेगळा विचार केला असंही अशोक चव्हाण म्हणाले. यावर अशोक चव्हाणांना विचारण्यात आलं की तुमची अस्वस्थता तुम्ही भाजपाला सांगितली की त्यांनी ती हेरली? त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “त्यांनी हेरलं की काय ते जाऊदेत. त्यांचा इंटेलिजन्स मोठा आहे.” असं माफक उत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस हुडी घालून भेटले होते का?
“योग्य वेळ आली की मी सगळं काही सांगेन. कोण कुणाकडे गेलं? ते महत्त्वाचं नाही तुम्हाला निकाल दिसतो आहे तो समोर आहे. या सगळ्याची योग्य वेळ आली की मी सांगेन. बरेच इंटरेस्टिंग विषय त्यात आहेत. निर्णय होत गेले किंवा काही गोष्टी घडत गेल्या. ऑल इज वेल दॅट्स एंड वेल असं मी मानतो.” असंही अशोक चव्हाण म्हणाले.
हे पण वाचा- “नाना पटोलेंनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं ही घोडचूक! ते घडलं नसतं तर..”, अशोक चव्हाणांचं ठाम मत
मी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही
“आणखी एक सांगतो, माझा स्वभाव मनमोकळा आहे. मी कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही. अशोक चव्हाण भाजपात जाणार ही मला घालवायची प्रोसेस होती. गोबेल्स थिअरी असते तसं ते होतं. आता माझ्यासह इतर नावंही जोडली गेली पण ज्यांना योग्य वाटत असेल ते येतील. काँग्रेसमध्ये खदखद आहे, नैराश्य आहे, पुढे काय होईल याची गॅरंटी नाही. काँग्रेसमध्ये जो राहिल तो आपल्या ताकदीवर निवडून येईल अशी सध्याची स्थिती आहे. अनेक मातब्बर आहेत, पण ते निराश आहेत.” असंही अशोक चव्हाण म्हणाले.