देशभरात राम मंदिरात भगवान रामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याचा आनंद आहे. अभिजीत मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली. अयोध्येतील मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरू असताना त्याचे थेट प्रक्षेपण देशभरातील विविध आस्थापना, संस्था आणि मंदिरात सुरू होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी आंतरवाली सराटीतून निघाले आहेत. २६ जानेवारीला ते मुंबईत पोहोचणार आहेत. आजच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिनी ते अहमदनगरला आहे. त्यामुळे आजच्या महासोहळ्यात मनोज जरांगे पाटीलही अहमदनगर येथून सामिल झाले. याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“आज भगवान श्रीरामाचं दर्शन घेतलं, आरती केली आणि विधिवत पूजाही केली. आज आमच्या भारतवासियांचा आनंदाचा दिवस आहे. खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत. हा आनंदाचा दिवस आम्ही अहमदनगर येथे साजरा केला”, असं मनोज जरांगे म्हणाले.
हा सोहळा भाजपाने हायजॅक केला आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याबाबत प्रश्न विचारला असता मनोज जरांगे म्हणाले, “अशा अर्थाने मी काही पाहणार नाही. भाजपा असो वा काँग्रेस असो. हा भारतवासियांचा आनंदाचा क्षण आहे. खूप दशकानंतर ही प्रतिक्षा आज संपली. आनंदाचा दिवस आज उगवला आहे. हिंदू धर्माचा हा गर्व आणि स्वाभिमान आहे.”
हेही वाचा >> Ram Mandir Ayodhya Inauguration Live: मी आज प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…- नरेंद्र मोदी
साकडं घालणार पण…
दरम्यान मराठा आरक्षणासाठी भगवान श्रीरामाकडे साकडे घातले का असंही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर जरांगे म्हणाले, “भगवान श्रीराम आज अयोध्येत विराजमान झाले आहेत. आज आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे उद्या त्यांच्याकडे साकडं घालू. उद्या वेगळं साकडं घालतो. आज फक्त आनंदच व्यक्त केला.”
तसंच, मराठा आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार का असा प्रश्नही पत्रकारांनी विचारला. त्यावर जरांगे म्हणाले, “मराठा आरक्षण मिळालं तर आम्हीही अयोध्येत जाणार. रेल्वे भरून घेऊन जाणार.”