नांदेड : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसच्या चार पिढय़ांनी देशात जे काम केले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत करून दाखविले आहे. मोदींनी परदेशातही भारताचा सन्मान वाढविल्याचा दावा करताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्याच हाती सत्ता सोपविण्याचे आवाहन येथील जाहीर सभेमध्ये शनिवारी केले.
आपल्या भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही वेगवेगळय़ा मुद्दय़ांवर समाचार घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीस नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने देशपातळीवर सुरू केलेल्या महाजनसंपर्क अभियानात अमित शहा यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नांदेड नगरीतील गुरूद्वारालगतच्या अबचलनगर पटांगणात झाली. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी तत्कालीन हैदराबाद संस्थान आणि मराठवाडय़ाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उल्लेख करून तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वातंत्र्यलढय़ाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केले.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मोदी सरकारची नऊ वर्षे म्हणजे भारताच्या गौरवाची, विकास-उत्कर्षांची, गरिबांच्या कल्याणाची, तसेच देशाच्या सुरक्षिततेची नऊ वर्षे आहेत. सर्वच क्षेत्रांत मोठे परिवर्तन झाले असून, या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ देशातील कोटय़वधी गरिबांना झाला असल्याचे आकडेवारीनिशी सांगून शहा यांनी पूर्वीचे यूपीए सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले होते, याकडे लक्ष वेधले.
राहुल गांधी यांना टोला
अयोध्येतील राम मंदिराची उभारणी पुढच्या वर्षी होणारच याचा पुनरुच्चार करताना मोदींमुळे देशाचा इतिहास आणि संस्कृतीचा गौरव वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे राहुल गांधी मात्र परदेशात देशाची बदनामी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.