मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेलं उपोषण दुसऱ्यांदा मागे घेतलं. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी आज छगन भुजबळ यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच छगन भुजबळ हे मराठा आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करु पाहात आहेत. मात्र त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. याचवेळी पत्रकारांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला फोन केला होता का? असा प्रश्न विचारला असता त्यावरही जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
भुजबळांना मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं?
माणसाने थोडसं भानावर येऊन बोललं पाहिजे. साखळी उपोषण करणारे मुलं, शांततेत आंदोलन करणारी मुलं घरी परतल्यानंतर मराठा समाजाचं आंदोलन बदनाम व्हावं म्हणून काही गोष्टी केल्या गेल्या. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना टार्गेट केलं जातं. साखळी उपोषण करणाऱ्यांना उचलून नेत आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल बोललो आहेत. ओबीसींचं आरक्षण संपवायचं आहे असं भुजबळ म्हणाले आहेत पण त्यांचं आरक्षण कसं काय संपणार? आयोगाच्या माध्यमातून जे मराठा समाजाचं हक्काचं आहे तेच द्या म्हणतोय. आम्ही कुणाचंही आरक्षण काढा म्हणत नाही असंही जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता का?
उपोषण सोडल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता का? हे विचारलं असता जरांगे पाटील म्हणाले, “होय. देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता. त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्याशी चांगला संवाद झाला. ते चौकटीच्या बाहेरचं काही बोलले नाहीत, मी पण चौकटीच्या बाहेर काही बोललो नाही. आम्ही काही त्यांचा द्वेष करत नाही. देवेंद्र फडणवीस यांचं आणि माझं काही शत्रुत्व नाही. त्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मी फोनवर बोललो. व्यवस्थित बोलणं झालं.” असं उत्तर जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ यांच्याशी आमची दुश्मनी नाही. खरा अन्याय झाला आहे तिथे छगन भुजबळ जात नाहीत. त्यांच्या पाहुण्यारावळ्यांबद्दल काही झालं की धाव घेतात. त्यांचा मास्टरमाईंड कोण मी कसं काय सांगणार? भुजबळच एक मोठा मास्टरमाईंड आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.