राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाट्यमय घडोमोडी पाहायला मिळत आहेत. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दाऊदशी संबंधित संभाषणाचं रेकॉर्डिंग असलेला एक पेनड्राईव्ह सादर केला. यामध्ये वक्फ बोर्डाच्या सदस्याचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी देखील फडणवीसांनी सभागृहात पेनड्राईव्ह सादर केला होता, त्यावरून नवी खळबळ माजली होती. फडणवीसांच्या पेनड्राईव्ह वरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना टोला लगावला आहे. तसेच, यावेळी फडणवीसांनी राज ठाकरेंना दिलेल्या पेनड्राईव्हचा देखील गृहमंत्र्यांनी उल्लेख केला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “आता १९९३ चा बॉम्बस्फोट हा तेव्हा झाला. २००५, २००६ आणि २००८ मध्ये मुंबई शहरावर हल्ले झाले आणि आपण आपल्या भाषणात असं म्हणताय, ३ फेब्रुवारी २०२२ रोजी या संदर्भातील एक एफआयआर दाखल झाला. १९९३ चा बॉम्बस्फोट त्यावर अनेकांना शिक्षा झाल्या होत्या आणि आता या जुन्या प्रकरणात आपण या ठिकाणी एनआयएचा एक गुन्हा दाखल करतो. हे आपल्याच भाषणातील आहे. मला या निमित्त एवढच आपल्याला विचारायंच आहे की आपण भाषण करताना हे सांगितलं की काही स्टींग ऑपरेशन झालं. १२५ तासांचं फुटेज आहे. त्यातून अनेक गोष्टी पुढे येतील मला माहीत आहे की आपण त्या दिवशी जो पेनड्राईव्ह दिला आहे अध्यक्षांना ते सगळं काही दिलेलं नाही. अजुनही काही राखून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जस जशी गरज लागेल तसं तुम्ही बाहेर काढाल न काढाल मला माहिती नाही. परंतु मला या निमित्त एकच सांगायचं आहे, की आपल्याला हे प्रकरण तुमचा आरोप काही जरी असला, तरी मी कोणाची पाठराखण करणार नाही. मात्र हे प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. की या सगळ्या घटनेच्या पाठीमागे नक्की कोण आहे आणि ही घटना कशा पद्धतीने पुढे घेऊन जायची. यामध्ये कोण दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करायची.”
तसेच, “ पण या निमित्त मला आपल्याला एक सांगायाचं आहे, की आपण एकदा मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांना ३३ हजार विहिरींचा जलयुक्त शिवारांचा आपण एक पेनड्राईव्ह दिला होता. मागच्या अधिवेशनात एक ६.५ जीबीचा एक पेनड्राईव्ह दिला. दोन दिवसांपूर्वी आपण एक पेनड्राईव्ह दिला. आज परत आपण पेनड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? ”असा सवाल यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला.