सागरपुत्र मच्छीमार सोसायटीतील कोटय़वधींच्या अपहारप्रकरणी या संस्थेचे चेअरमन वामन केशव चुनेकर यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जमिनीसाठीचा अर्ज गुरुवारी कोर्टाने फेटाळून लावला. सार्वजनिक निधीच्या अपहाराची गंभीर दखल न्यायालयाने घेतल्याची माहिती या प्रकरणातील प्रमुख तक्रारदार व सामाजिक कार्यकत्रे अजय ऊर्फ राजू भोईर यांनी गुरुवारी अलिबाग येथे दिली.      आरोपी वामन केशव चुनेकर यांच्यातर्फे बाजू मांडताना अ‍ॅड. जयदीप ठक्कर यांनी त्यांचे अशील हे एकटेच या घोटाळ्याला जबाबदार नसून, मेरीटाइम बोर्ड, बंदर विभागाचे अधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या कागदपत्रांप्रमाणे संस्थेने कार्यवाही केल्याची बाजू मांडली. फिर्यादींतर्फे अ‍ॅड. सुशील पाटील व अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी जोरदार युक्तिवाद केला. संस्थेचे सदस्य बनविणे ही प्रक्रिया प्रथम पूर्ण झाली असून, फिर्यादी हे संस्थेचे सदस्य नसताना त्यांना सदस्य बनविण्यासाठी चेअरमन वामन चुनेकर यांनी ओळख असल्याचा दाखला दिला. त्यांच्या या घोटाळ्यामध्ये प्रमुख सहभाग असल्याने तसेच कोळी बांधवांच्या कल्याणासाठी शासन खर्च करीत असलेल्या निधीचा गरव्यवहार झाला. या घोटाळ्यामध्ये अधिक तपास केल्यास याची व्याप्ती मोठय़ा प्रमाणावर सिद्ध होणार असल्याने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी विनंती कोर्टास केली. दोन्ही बाजू ऐकून घेऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी चुनेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
चुनेकर हे शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे मच्छीमार बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.  काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषद घेतली. अजय भालचंद्र भोईर, सामाजिक कार्यकत्रे विनोद पांडुरंग पाटील, सूर्यकांत सखाराम पाटील, महेश जनार्दन गुंड, महेश हिरू गायकर, कैलाश जानू गायकर, कृष्णा हाशा गुंड, विनायक भाऊ आरकर, मंगेश धर्मा वाडकर आदी तक्रारदार उपस्थित होते. गवंडी असणाऱ्यांना मच्छीमार दाखवून त्यांच्या नावे बोगस होडय़ांची नोंदणी केली. गेल्या दहा वर्षांत कोटय़वधी रुपयांचा डिझेल सबसिडी घोटाळा सागरपुत्र मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन वामन केशव चुनेकर व इतर संचालकांनी केला. मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी, बंदर विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून अपहार केल्याचा आरोप अलिबागच्या पत्रकार परिषदेत केला होता.  त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये वामन केशव चुनेकर, चेअरमन सागरपुत्र सहकारी संस्था, ताराबंदर, बोर्ली मुरुड व या संस्थेचे संचालक मंडळ यांच्यावर भा.दं.वि.सं.चे कलम ४०६, ४६५, ४६८, ४२०, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.