अलिबाग– समुद्रतून डिझेलची तस्करी करणारी एक टोळी रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनी जेरबंद केली आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपींनी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३३ हजार लिटरचा डीझेल साठा जप्त करण्यात आला आहे.समुद्र मार्गाने डिझेलची तस्करी सरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिग गुन्हे शाखेला या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
ज्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रसाद पाटील, संदिप पाटील, राजा पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांचा समावेश होता. हे पथक डिझेल तस्करांच्या मागावर होते. अशातच सोमवारी रेवस जेट्टी येथे एक बोट डिझेल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाच्या हाती लागली. त्यामुळे पथक पाळत ठेवून होते. तेव्हा एक बोट संशयास्पद रित्या किनाऱ्यावर येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बोटीची तपासणी केली असतात. त्यात ३३ हजार लिटरचा डिझेल साठा असल्याचे आढळून आले. यावेळी बोटीवर चार जण होते. या चौघांनाही पंचनामा करून पोलीसांनी ताब्यात घेतले. एकूण ३६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
हेही वाचा >>>सातारा जिल्ह्यात बेंदूर बाजार सजला
या प्रकऱणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात भादवी कलम २८७, अत्यावश्यक वस्तु सेवा अधिनियमच्या कलम ३,७ सह पेट्रोलियम अधिनियमच्या कलम ३, २३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश काशिनाथ कोळी, विनायक नारायण कोळी, गजानन आत्माराम कोळी आणि मुकेश खबरदात निषाद या अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. सर्व जण बोडणी तालुका अलिबाग येथील रहिवाशी आहेत.