महाड तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री जाकमाता देवीचा नवरात्रोत्सव उद्यापासून (१६ ऑक्टोबर) सुरू होत आहे. सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात आले असून, यावर्षी महाड व्हिजन-२०२० हा विशेष कार्यक्रम पाच दिवस होणार असून महाडकर नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री जाकमाता देवी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष शांताराम मांगडे यांनी कळविले आहे.
श्री जाकमाता देवीचे शहरातील मंदिर पुरातन देवालय म्हणून प्रसिद्ध आहे. शिवकालांमध्ये पश्चिमेला तटबंदी होती. गावाचे रक्षण करणारी देवी म्हणून तिची स्थापना करण्यात आली. नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांमध्ये देवीविषयी अपार श्रद्धा आहे. अनेक वर्षांपासून गावकरी देवीचा नवरात्र उत्सव भव्य स्वरूपामध्ये साजरा करताना समाजप्रबोधन कार्यक्रम सादर करण्याची प्रथा पूर्वीपासून असल्याने रायगड जिल्हय़ात हे असे एकमेव मंडळ आहे की, उत्सव काळामध्ये करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्याऐवजी लोक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. श्री जाकमाता नवरात्र उत्सव मंडळातर्फे यावर्षी आगळावेगळा महाड व्हिजन-२०२० कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये महाड नगरीचा कारभार हा पारदर्शक असावा, याकरिता जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधील संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपल्या परिसरांतील पाणी, आरोग्य, शिक्षण, बालकल्याण, बांधकाम याबाबतचे सामाजिक प्रश्न मंडळाच्या अध्यक्षांकडे पाठवून देण्याचे आव्हान संयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमांमध्ये नगरपालिकेतील विविध विभागांचे सभापती, सदस्य, नगराध्यक्ष उपस्थित राहाणार असून चर्चात्मक संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक दीपक शिंदे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा