हिंगोली : विधानसभा निवडणुकीत ३० ते ४० कोटी रुपये खर्च करावे लागतात. निवडणुकीत होणाऱ्या खर्चाच्या या दहशतीमुळे उमेदवाराला सध्याच्या काळात निवडणूक लढवणे कठीण झाले आहे. राजकीय पक्षांना तर पुढील काळात ‘उमेदवार नियुक्त करायचे आहेत’ अशी जाहिरातच द्यावी लागेल, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी हिंगोली येथे बोलताना व्यक्त केली.
हिंगोली येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी माणिकराव टाकळगव्हाणकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, सध्याच्या स्थितीत सत्तेच्या जवळ गेल्याशिवाय आपले जमणार नाही अशी खुणगाठ अनेकांनी बांधली आहे. पूर्वी आमदार कोणत्याही प्रकारचा खर्च न करता निवडून येत होते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत उभे राहणे कठीण झाले आहे. पैसे खर्च करणाराच विजयी होतो, असा समज होत असून, हे लोकशाहीला घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वी प्रत्येकाकडे चौकस बुद्धिने पाहिले जायचे. मात्र, आता कोणी कोणाबद्दल बोलत नाही, कितीही गुन्हे केले तरी त्याचा आदर सत्कार करून आपले साधून घेणे हेच सुरू आहे, असेही पाटील म्हणाले. देशात शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्येही अमुलाग्र बदल झाला असून, पूर्वी सिंचनाच्या पाण्यासाठी आंदोलने होत होती. आता शेतीमालास भाव मिळावा, पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची आंदोलने होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले.