बोईसर महसूल मंडल कार्यालयात योजना बारगळली

बोईसर : बोईसर येथे महसूल कार्यालयात उद्घाटन करण्यात अलेले डिजिटल सातबारा देणारे यंत्र गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडले आहे. ‘डिजिटल इंडिया’ अशी घोषणा करत केंद्र व राज्य शासनाने अनेक ऑनलाइन प्रणालींचे मोठय़ा थाटात उद्घाटन केले. मात्र सोयीसुविधांचा अभाव असल्याने या योजना बारगळल्या आहेत.

बोईसर मंडल अधिकारी कार्यालयात नागरिकांना जमिनी संदर्भात सातबारा उतारे व फेरफार लवकर मिळावे यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिजिटल सातबारा यंत्र बसवण्यात आले होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांतच हे यंत्र बंद पडले. हे यंत्र अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाही. पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा, फेरफार आणि  जमिनी संदर्भात इतर दाखले ऑनलाइन पद्धतीने त्वरित मिळावे यासाठी हे यंत्र बसवण्यात आले. यासाठी वर्षभरापासून दस्तावेज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया पालघर येथे सुरू आहे. मात्र अनेक गावांची ऑनलाइनची कामे बाकी असल्याने ऑनलाइन पद्धतीने सातबारे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ऑनलाइन सातबारे दस्तावेज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाच पालघर महसूल विभागाने केवळ वरिष्ठांना दिसावे यासाठी महसूल कार्यालयात डिजिटल सातबारा यंत्र बसवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र हे यंत्र बंद अवस्थेत असल्याने ते कधी सुरू होईल, असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

सध्या ज्या गावांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे, अशा गावांचे सातबारे ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांनी स्वत: काढले असतील तरी त्यावर डिजिटल स्वाक्षरी येत नसल्याने शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

तांत्रिक कारणांमुळे सातबारा डिजिटल यंत्र बंद आहे. हे यंत्र दुरुस्त करण्याबाबत संबंधित कंपनीला सांगण्यात आले आहे.

– संदीप म्हात्रे, मंडल अधिकारी, बोईसर

Story img Loader