ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी झाल्याने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस अडचणीत आली आहे. अशातच आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी साथ सोडल्याने काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांशी हातमिळवणी करून राष्ट्रवादीने विश्वासघात केल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
राजकारणात कोणी कधी कोणाचा मित्र नसतो अथवा कोणी कोणाचा शत्रूही नसतो हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे विरोधात आगपाखड करणाऱ्या शेकापने आता तटकरेंचे गुणगान गाण्यास सुरुवात केली आहे. तटकरे विरोधात भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढणाऱ्या शेकापने जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्यासाठी आता राष्ट्रवादीशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील काँग्रेस कमिटी मात्र कोंडीत सापडली आहे.
आघाडी आणि जागा वाटपावरून काँग्रेस राष्ट्रवादीत मतभेद आहेत. अशातच राष्ट्रवादीला जिल्ह्यात जादा जागा हव्या आहेत. राज्यात आघाडीबाबतचा निर्णय झाला नाही तर याचा थेट फायदा विरोधीपक्षांना होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीने शेकापला कुरवाळण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. जिल्ह्यात स्वत:चे अस्तित्व कायम राखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहे. या आघाडीचा थेट फायदा राष्ट्रवादीला दक्षिण रायगडात, तर शेकापला उत्तर रायगडात होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेससमोरील अडचणीत वाढ होणार आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल हे चार मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला आहेत. या चारही मतदारसंघात शेकाप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. तर कर्जत, श्रीवर्धन आणि महाड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. या ठिकाणी शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडीचा थेट फटका काँग्रेसला बसणार आहे. तर शेकापच्या मतांचा फायदा दक्षिण रायगडात राष्ट्रवादीला होणार आहे.
जिल्हा परिषदेतील आघाडीमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि पर्यायाने सुनील तटकरे यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत ज्या काँग्रेसनी तटकरे यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत काम केले होते. ते काँग्रेस नेते आता तटकरेंवर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेकापला जवळ करणार नाही अशी छाती फाडून दाखवू का, असे जाहीर करणारे तटकरे अचानक का बदलले याची उत्तरे आता काँग्रेस नेते शोधू लागले आहेत.
   शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी हा तर काँग्रेससाठी चिंतेचा विषय असणार आहेच. पक्षांतर्गत घडामोडी काँग्रेससाठी धोकादायक ठरणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी मंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकले गेले. पक्षात त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला स्थान राहिले नाही याचे शल्य त्यांच्या मनात आहे. रायगड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने तो लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडू नये, असे त्यांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही. यामुळे बॅरिस्टर अंतुले चांगलेच संतापले. याबाबत पक्षश्रेष्ठींवर त्यांनी जाहीर टीकादेखील केली. तर लोकसभा निवडणुकीत शेकाप उमेदवारांना आशीर्वाद देऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अंतुले यांच्यानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पक्षाचे मार्गदर्शक म्हणून पाहायले जाऊ लागले. जिल्ह्यासंदर्भातील प्रमुख निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. पण त्यांनीही खारघर टोलच्या मुद्दय़ांवर आता त्यांनीही काँग्रेसची साथ सोडली आहे. एमएमआरडीएचे सदस्य म्हणून काम पाहणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाच वर्षांत आपल्या पदाचा वापर करून मोठा निधी मतदारसंघात आणला. उड्डाणपूल, नाटय़गृह, क्रीडा संकुल यासारखी कामे त्यांनी करून घेतली. मात्र अचानक काँग्रेसचे मुख्यमंत्री निर्णय घेण्यात उशीर करत असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी ही वडिलांसोबत सोबत भाजपच्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व करेल आणि मार्गदर्शन करेल असा नेताच पक्षात उरला नाही. कारण गेल्या पाच वर्षांत राज्यात सत्ता असली तरी त्याचा फायदा पनवेल वगळता जिल्ह्य़ातील काँग्रेस संघटनेला कधी झालेला नाही. जिल्ह्यात पक्ष वाढावा यासाठी पक्षनेतृत्वाने प्रयत्न केले नाही. या सर्व घटनांचा थेट फटका काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत बसणार आहे. त्यामुळे पक्षाला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.