रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आणि मापगाव विभागातील शेकापचे खंदे कार्यकर्ते दिलीप भोईर यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.  आज मंगळवारी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण , आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी उपस्थित होते.

मागील २ वर्षांपासून दिलीप भोईर शेकापमध्ये नाराज होते. शेकाप नेत्यांशी त्यांचे सुर जुळत नव्हते. त्यांचे अनेकदा खटके उडत होते. अखेर ते पक्ष संघटनेपासून दूर राहिले. त्यामुळे ते पक्ष सोडतील अशी अटकळ बांधली जात होती. काही महिन्यांपूर्वी ते शिवसेनेत प्रवेश करतील अशीही चर्चा होती मात्र सेनेतील फुटीमुळे ही चर्चा मागे पडली. महिनाभरापूर्वी ते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आले. आणि त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. शेकापला अखेरचा लाल सलाम करत आज ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे अलिबाग तालुक्यात कमजोर असलेल्या भाजपला मोठे बळ मिळाले आहे. तर खिळखिळा होत चाललेल्या शेकापला मोठा धक्का बसला आहे.

दिलीप भोईर हे गेली २५ वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २००७ साली झिराड ग्रामपंचायतीचे अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले. पुढे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते शेकापक्षात डेरेदाखल झाले. २०१२ व २०१७ मध्ये ते मापगाव जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आले. रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात त्यांनी चांगले काम केले.  कोरोना काळात गोरगरिबांना मदत आणि लसीकरण मोहीम यामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांचे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक उपक्रम वर्षभर सुरू असतात.

शेकाप आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी गेली काही वर्षे अलिबाग तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत होतो. परंतु अलीकडच्या काळात पक्ष नेतृत्वाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे विकास कामात अडथळा येत होता. अशा परिस्थितीत काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची कुचंबणा होत होती. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि देशात, राज्यात सत्तेत आहे. अलिबागच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आम्ही राष्ट्रीय प्रवाहात सामील झालो आहोत. – दिलीप भोईर