राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर आज पवारांनी त्यांचा निर्णय रद्द केला असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राजकीय चर्चांना उधाणं आलं आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, शरद पवारांनीच पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहावं ही आमची इच्छा कायम असेल.
दिलीप मोहिते पाटील म्हणाले, “शरद पवार साहेब गेल्या २३ वर्षांपासून या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या परीने पक्षासाठी खूप मेहनत घेतली आहे. ते पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना राजकीय पदं मिळाली. परंतु ज्यांना ही पदं मिळाली त्यांनी पवारसाहेबांइतकी मेहनत घेतली असती तर आज आमचा पक्ष राज्यात एक नंबरला असता. २३ वर्षात साहेबांमुळे, अजित दादांमुळे पक्ष आम्ही ५० ते ६० आमदरांपर्यंत नेला. परंतु आमच्या मागून आलेली भारतीय जनता पार्टी १२० आमदारांपर्यंत पोहोचली.” मोहित पाटील साम मराठीशी बोलत होते.
हे ही वाचा >> “५६ वर्षात उत्तराधिकारी तयार करू शकला नाहीत, आता…”, ‘त्या’ प्रश्नावर शरद पवारांचं थेट उत्तर, म्हणाले…
मोहिते पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात जास्त काळ आमचा पक्ष सत्तेत होता तर आमचा पक्ष का मोठा होत नाही? सत्तेत बराच काळ राहूनही आमचा पक्ष मागे का राहिला? कदाचित या सर्व गोष्टींवर विचार करण्यासारखा प्रसंग निर्माण झाला असेल. कोणी फारसं दुखावेल असं शरद पवार साहेब बोलत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपला पक्ष राज्यात एक नंबरला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकच आमदार निवडून येतो आणि तेच मंत्री होतात. त्यांना इतक्या वर्षात आपल्या जिल्ह्यात दुसरा आमदार निवडून आणता येत नाही.
ज्या लोकांना पवार साहेबांनी ताकद दिली त्यांना पक्ष मोठा करता आला नाही, अशी खंत मोहिते पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. पाटील म्हणाले, कोणावर माझा राग आहे, म्हणून मी हे बोलत असं काही नाही. परंतु पक्ष वाढवला पाहिजे यासाठी मी अधिकारवाणीने बोलतोय. कोणीतरी हे बोललं पाहिजे, याची जाणीवर करून दिली पाहिजे.