अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नऊ आमदारांसह बंड केलं आहे. या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाची चर्चा होत आहे. शिवसेनेचे एक-एक आमदार एकनाथ शिंदेबरोबर जात होते. पण, याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील नव्हती का? असे सवाल उपस्थित झाले होते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
“दिलीप वळसे-पाटील यांना एकनाथ शिंदेंच्या बंडाची माहिती होती, अशी शंका येत आहे,” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
हेही वाचा : ठिणगी पडली! अमोल मिटकरींनी ‘त्या’ प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांना खडसावलं; म्हणाले, “शरद पवार…”
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या बंडाची माहिती दिलीप वळसे-पाटील यांना होती, अशी शंका येत आहे. कारण, बंडासाठी सहाय्य वळसे-पाटील यांच्याकडून करण्यात आलं होतं. पण, वळसे-पाटलांच्या मनाला माहिती, त्यांनी काय केलं. गृहमंत्री असल्याने पोलीस सर्व माहिती देत असतात. मात्र, एवढी मोठी बातमी पोलीस गृहमंत्र्यांपासून कधीही लपवणार नाहीत.”
“दिलीप वळसे-पाटील हे हुशार आहेत. ते कायद्याचे विद्यार्थी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचा निकाल दिला आहे. त्यात पक्ष कोणाचा? व्हीप कोणाचा लागू होणार? प्रतोद कोणी नेमायचा? हे सर्व दिलं आहे. पण, वळसे-पाटलांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्यापही समजून कसा सांगितला नाही, याचं आश्चर्य वाटतं,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे, पण…”, सुषमा अंधारेंचं विधान
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू अशी दिलीप वळसे-पाटील यांची ओळख होती. वळसे-पाटील हे राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. शरद पवारांनी त्यांना अनेकदा मंत्रीपदावर काम करण्याची संधी देखील दिली. काही झाले तरी वळसे पाटील हे शरद पवार यांची साथ कधीही सोडणार नाहीत, असे सर्वांनाच वाटत होतं. पण, अजित पवार यांच्याबरोबर जाऊन थेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.