Purva Walse Patil Social Media Post: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निसटता विजय झाला. अवघ्या दीड हजार मतांनी त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा पराभव केला. शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना पाडण्याचे आवाहन आंबेगावच्या सभेत केले होते. त्यामुळे आंबेगावच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र आता आंबेगावमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे. विरोधकांनी घेतलेल्या आभार मेळाव्यात बोलताना “लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल”, असे विधान केले होते. यावर आता दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूची कामना केली गेली, असा आरोप पूर्वा वळसे पाटील यांनी केला.
पूर्वा वळसे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक दुर्दैवी अपघात झाला. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ते या दुखापतीतून जिद्दीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही संपूर्ण कुटुंब या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्यावर झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेमुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली असते. थोड्याच दिवसात ते या संकटावर सुद्धा मात करून नक्कीच पूर्वीसारखे व्हावेत अशी आम्ही रोज परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परंतु काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या आभार मेळाव्यात त्यांच्या प्रकृती बद्दल बोलताना “लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल” असे अभद्र वक्तव्य केले गेले.”
राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का? पूर्वा वळसे पाटील
“हे ऐकल्यानंतर काय बोलावे मला सुचत नाही. काही दिवसांपूर्वी वळसे पाटील साहेबांचा फोटो ज्यांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात लावला होता तेच आज साहेबांच्या अंताची प्रार्थना करीत आहेत? तुम्ही नक्की निवडणुका लढा, जिंका, त्यात हरकत असण्याचे काही कारण नाही परंतु या सर्व गोष्टी करत असताना उन्माद किती असावा? सत्ता मिळवण्याच्या नादात आपण किती खालच्या पातळीला जात आहोत? शत्रुत्व करण्याच्या नादात आपण कोणतीच मर्यादा ठेवली नाही का? सुसंस्कृतपणाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या तालुक्यातील राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का? तालुक्यात पस्तीस वर्षे जनतेची अविरत सेवा केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल असे बोलताना आपली जीभ जराही कचरली नाही का?”, अशा शब्दात पूर्वा वळसे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.
नकोच ते राजकारण
पूर्वा वळसे पाटील पुढे म्हणाल्या, “कृतघ्नपणाचा कळस गाठलेल्या या लोकांसाठी राजकारण आणि निवडणुका हेच सर्वस्व आहे का? एखाद्या आजारी व्यक्तीची तुम्ही मरणाची कामना करणार का? माणूस आणि माणुसकीला काहीच किंमत उरली नाही का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटून आले आहे. असे काही ऐकून त्यावर उत्तर देण्यापेक्षा मला नकोच ते राजकारण असे वाटू लागले आहे.”
ट्रम्पेट चिन्हाचा शरद पवार गटाला फटका
आंबेगाव विधानसभेत दिलीप वळसे पाटील यांना १,०६,८८८ मते मिळाली. तर शरद पवार गटाच्या उमेदवाराला १,०५,३६५ मते मिळाली. अवघ्या १५२३ मतांनी निकम यांचा पराभव झाला. पण तुतारीसदृश्य ट्रम्पेट चिन्हावर लढणाऱ्या आणि देवदत्त निकम नाव असलेल्या उमेदवाराला २९६५ एवढी मते मिळाली.