लागोपाठ येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी कायद्याचं पालन करावं असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि रमजान हे सगळे सण एकत्र आले. नागरिक हे सण उत्साहाने साजरे करतात, त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याच्या पार्श्वभूमीवर आज बैठक झाल्याची माहितीही यावेळी गृहमंत्र्यांनी दिली. तसंच कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्यं न करण्याचं आवाहनही त्यांनी राजकीय नेत्यांनी केली आहेत.
याबद्दल माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सगळे सण शांततेत पार पडतील यासाठी पोलिसांची पूर्ण तयारी आहे. कोणी जर काही वेगळं करायचा प्रयत्न केला तर पोलीस ती परिस्थिती जबाबदारीने हाताळतील. या बाबतीत कोणालाही सूट दिली जाणार नाही. राजकीय नेत्यांनीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्यं करू नयेत, तसंच माझी नागरिकांनाही विनंती आहे की त्यांनी अशा वक्तव्यांना बळी पडू नये.
राज ठाकरेंच्या ठाण्यातल्या सभेबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, सभा झाल्यावर सभेत ते काय बोलले हे पाहून त्यावर उत्तर दिलं जाईल. यावेळी माध्यमांनी किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनाबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं, तसंच रघुनाथ कुचिक प्रकरणावरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.