राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जवळपास १४ ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या भूमिकांपासून थेट कलम ३७० पर्यंतच्या मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. अशा प्रकारे ट्वीट करून काहीही फायदा नाही, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.
शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू केलं अशा आशयाची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर या मुद्द्यावरून मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये पवारांवर निशाणा साधला आहे. “इशरत जहाँला फक्त निर्दोषच म्हटलं गेलं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी तिला मदत देखील देऊ केली. तसेच, त्या काळी आयबीच्या अधिकाऱ्यांचा देखील अपमान राष्ट्रवादीकडून झाला”, असं फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच, बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील कलम ३७० ला विरोधच होता, असं फडणवीस म्हणाले आहेत.
तसेच नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचेही फडणवीसांनी स्मरण करुन देत पवारांवर निशाणा साधला आहे.
“पवारांवर टीका करणं हा छंद झालाय”
दरम्यान, यासंदर्भात विचारणा केली असता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “शरद पवारांवर टीका करणं हा आता सगळ्यांचा आवडता छंद झाला आहे. शरद पवार यांच्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या भूमिका वर्षानुवर्ष लोकांना माहिती आहेत. अशा प्रकारचे ट्वीट करून त्यात काही फायदा होईल, असं मला वाटत नाही”, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.
नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध?
दरम्यान, नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध जोडल्यावरून देखील वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ही काही नवीन बाब नाही. यापूर्वी देखील अशाच प्रकारे प्रयत्न झाले. नवाब मलिक यांची केस पीएमएलए कायदा येण्यापूर्वीची आहे. इतकी जुनी केस काढून दाऊदशी कोणताही संबंध नसताना ओढून-ताणून संबंध जोडायचा हा प्रकार आहे. या पूर्वीही शरद पवारांशी असा संबंध जोडायचा प्रयत्न भाजपानं केला होता. मला त्यात काही तथ्य दिसत नाही”, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.