महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. महायुतीला राज्यात तब्बल २३५ जागांवर विजय मिळाला. महाविकास आघाडीला अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालांनतर राज्यात मुख्यमंत्रीपदी कोण येणार? देवेंद्र फडणवीस की अजित पवार? अशी चर्चा सुरू झाली. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दोन्ही शिवसेना किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशीही चर्चा सुरू झाली. आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अशाच तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज यशवंतराव प्रतिष्ठानच्या विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या निमित्ताने दिलीप वळसे पाटील हे सेंटरवर दाखल झाले होते. त्यावेळी तिथे शरद पवार हेदेखील उपस्थित होते. या दोघांमध्ये यावेळी सविस्तर चर्चा झाली. दिलीप वळसे पाटील बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीवेळी नेमकी काय चर्चा झाली? याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी तपशील नमूद केला.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिष्ठानचा विश्वस्त म्हणून बैठकीसाठी उपस्थित होतो असं नमूद केलं. “माझी शरद पवारांशी भेट झाली. कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती. मी एक विश्वस्त या नात्याने या बैठकीला उपस्थित होतो. बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर उपयुक्त अशी चर्चा झाली. मी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले”, असं वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, प्रचारसभांमधून शरद पवारांनी टीका केल्याबाबत विचारणा केली असता आता ते विसरलो असल्याचं ते म्हणाले. “प्रचारसभांमध्ये काय झालं ते मी विसरलो आहे. या भेटीत आमची राजकीय चर्चा झालेली नाही. फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भात चर्चा झाली. विधानसभा निकालांच्या संदर्भात चर्चा झाली, पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काय घडलं त्यावर चर्चा झाली. माझ्या स्वत:च्या निवडणुकीबाबत चर्चा झालेली नाही”, असं सूचक उत्तर यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी दिलं.
दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार?
अजित पवार व शरद पवार हे दोन्ही मातब्बर नेते पुन्हा एकत्र येणार का अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा अखंड होणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्याशिवाय शरद पवारांकडचे आमदार अजित पवारांकडे येणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात विचारणा केली असता त्यावर वळसे पाटील यांनी सूचक विधान केलं. “दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत अजूनतरी तशी चर्चा वगैरे कुणाच्या समोर आलेले नाही. अजून बऱ्याच राजकीय गोष्टी घडायच्या आहेत. अजून मुख्यमंत्री, मंत्रीमंडळ निवडायचंय. विधानसभा अधिवेशन व्हायचं आहे. त्यानंतर कुणी काही चर्चा केली तर हा विषय तेव्हाचा आहे. पण आज लगेच कुठल्या पक्षाचे लोक कुठल्या पक्षात जातील हे काही मला पटत नाही”, असं वळसे पाटील म्हणाले.