Dilip Walse Patil : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला. त्यानंतर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशही नागपूरमध्ये पार पडलं. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा झाल्यानंतर अखेर आज खातेवाटप झालं. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना महायुतीमधील अनेक मोठ्या नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. यानंतर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. एवढंच नाही तर कार्यकर्त्यांशी चर्चा करत आपण आपली भूमिका जाहीर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तसेच जहां नहीं चैना, वहां नहीं रहना, असं सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केलं होतं.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. मात्र, मंत्रिपद मिळालं नसलं तरीही आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. आता एका कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटील यांना एका कार्यकर्त्यांनी तुम्हाला मंत्रिपद मिळायला पाहिजे, अशी मागणी केली. कार्यकर्त्याची मागणी ऐकल्यानंतर लगेच दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “काय सांगू? पंधराशे मतांनी निवडून आलोय, मला मंत्री करा?”, असं म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी काहीसी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कोणतं खातं कोणाकडे? वाचा संपूर्ण यादी!
u
निवडणुकीतील प्रचारासंदर्भात बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं की, विधानसभेच्या निवडणुकीत एक प्रचार करण्यात आला की बदल हवा. मात्र, बदल का हवा? माझी काय चूक झाली की त्यामध्ये हा बदल करण्यासाठी काही लोकांनी पावलं टाकली”, असा सवालही दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केला.
मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराजी आहे का?
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे दिलीप वळसे पाटील हे देखील नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, त्यांनी अधिवेशनातच माध्यमाशी प्रतिक्रिया देत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “पक्षावर माझी काहीही नाराजी नाही, पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे”, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं होतं.