नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली होती. दरम्यान, यावरून विविध राजकीय चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही या विधानाचं समर्थन केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाल वळसे पाटील?
महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा व्हायला हवी होती. वास्तविक नाना पटोले यांनी त्यावेळी अध्यक्ष पद सोडायला नको होते. त्यांनी जर अध्यक्षपद सोडलं नसतं तर हे सर्व घडलं नसतं. मात्र, आता यावर सार्वजनिक चर्चा करणं योग्य नाही. आमच्या पातळीवर आम्ही चर्चा करु. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर मी जास्त बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सर्वप्रथम आमदारांच्या निलंबनावर निर्णय व्हायला हवा. न्यायालयात यावर ताबडतोब सुनावणी होणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला गंभीर आहे. पोलीस विभागाने अशा घटनांबाबत काळजी घेणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.