अनिकेत साठे

नाशिक : राष्ट्रवादी शरद पवार गटाने भास्कर भगरे या सामान्य शिक्षकाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा पराभव करून भाजपचा दिंडोरी हा गड काबीज केला. शिवाय चार विधानसभा क्षेत्रात लक्षणीय मताधिक्य मिळवत अजित पवार गटालाही हादरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा, विधानसभा क्षेत्रात महायुतीचा प्रभाव, भाजपची यंत्रणा, व्यवस्थापन कौशल्य अशी कुठलीही मात्रा येथे लागू पडली नाही. मर्यादित साधनसामग्रीत महाविकास आघाडीने शेतकऱ्यांमधील अस्वस्थता मतांमध्ये परावर्तित केली.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Eknath shinde and narendra modi
नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये शिंदे गटाचे किती खासदार असणार? ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा!
Prakash Ambedkar Slams PM Modi
“.. तर अकोल्यात गेम झाला असता”, प्रकाश आंबेडकरांचे मविआवर पुन्हा आरोप; म्हणाले “त्यांनी जाणीवपूर्वक…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates in Marathi or/ Narendra Modi Swearing-in Ceremony Updates
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात दिसणार महाराष्ट्रातील ‘ही’ महिला खासदार; शपथविधीसाठी पक्षनेतृत्वाचा फोन, म्हणाल्या…
Raksha Khadse and Eknath Khadse
Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : सुनेला मंत्रिपदाची संधी मिळाल्यावर सासऱ्यांचे डोळे पाणावले; रक्षा खडसेंना आमंत्रण आल्यावर एकनाथ खडसे म्हणाले…
Raosaheb Danve
लोकसभेला महाराष्ट्रात भाजपाला कशाचा फटका बसला? रावसाहेब दानवे म्हणाले, “राजकीय वातावरणात…”

पुनर्रचनेपासून सलग तीनवेळा साथ देणाऱ्या भाजपच्या बालेकिल्ल्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुरुंग लावला. मागील दोन निवडणुकांमध्ये पक्ष एकसंध असतानाही जे प्रत्यक्षात आले नाही, ती किमया यावेळी पक्षाने एकही स्थानिक आमदार सोबतीला नसताना करून दाखवली. संपूर्ण प्रचार कांदा आणि शेतीच्या स्थानिक प्रश्नांवर केंद्रित ठेवून सत्ताधाऱ्यांना गारद करण्याची रणनीती त्यांनी यशस्वी केली.

मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व असताना अजित पवार गटाकडील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉ. भारती पवार पिछाडीवर राहिल्या. त्यांना केवळ भाजप (चांदवड) आणि शिवसेना शिंदे गटाच्या (नांदगाव) मतदारसंघात आघाडी मिळू शकली. भगरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (येवला), विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ (दिंडोरी), दिलीप बनकर (निफाड) आणि नितीन पवार (कळवण) यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली.

भाजपअंतर्गत आणि मित्रपक्षातील आरोप-प्रत्यारोपांनी महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचा संदेश गेला. कांदा निर्यात बंदीचा विषय भाजपसाठी डोकेदुखी ठरला. मराठा-ओबीसी आरक्षण वादानेही पराभवाला हातभार लावला.

उमेदवार निवडीचे कौशल्य

भाजपमधून डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीला विरोध होता. स्वीय सहायकांमार्फत कारभार, जनसंपर्काचा अभाव, पक्षीय पदाधिकाऱ्यांना लवकर भेट न मिळणे, असा नाराजीचा सूर लावत जागा राखण्यासाठी उमेदवार बदलण्याचा आग्रह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षनिरीक्षक राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर धरला होता. मात्र पक्षाने त्यावर विचार केला नाही आणि जागा गमावली.

माकपची नाराजी दूर

या मतदारसंघात माकपचा प्रभाव आहे. प्रत्येक निवडणुकीत या पक्षाला एक ते सव्वा लाख मते मिळतात. यावेळी माकपकडून माजी आमदार जे. पी. गावित यांनी उमेदवारी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर मतविभागणीचे निर्माण झालेले संकट शरद पवार यांनी माकपचे बंड वेळीच थंड करीत दूर केले.

रायगड: शेकापपुढे अस्तित्वाचा प्रश्न

हर्षद कशाळकर

शेकापचे प्राबल्य असलेल्या अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मताधिक्य लक्षणिय दृष्ट्या वाढले आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणूकीत शेकापने महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अनंत गीते यांना पाठींबा देऊन अलिबाग आणि पेण मतदारसंघातून चांगेल मताधिक्य देण्याची ग्वाही दिली होती. मात्र निवडणूक निकालानंतर तसे झाल्याचे दिसून येत नाही. अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत.

अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघ हे शेकापचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते. मात्र आता दोन्ही मतदारसंघात पक्षाचे अस्तित्व अडचणीत आले असल्याचे चित्र आहे. धैर्यशील पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश केला. नेते गेले तरी मतदार पक्षासोबत कायम असल्याच्या शेकाप नेत्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पेण विधानसभा मतदारसंघात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना तब्बल ४६ हजारांचे मताधिक्य मिळाले. शेकाप, काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्ष सोबत असूनही गीतेंना अपेक्षित मते मिळाली नाहीत. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. तिथे तटकरे यांना तब्बल ३८ हजारांचे मताधिक्य मिळाले. शेकापचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात गीतेंची झालेली पिछेहाट महाविकास आघाडीसाठी धक्कादायक ठरली.

अवघ्या तीन ते चार महिन्यांनतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत अलिबाग आणि पेण मतदारंसघातून शेकाप महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लोकसभेचा निवडणूक निकाल पक्षासाठी धोक्याची घंटा वाजवणारा आहे. त्यामुळे या निकालाचे आत्मचिंतन करून पक्षाला पुढची पाऊले टाकावी लागणार आहेत. जिल्ह्यात शेकाप आणि काँग्रेस पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने विधानसभेला काँग्रेसकडून कितपत सहकार्य मिळेल याबाबत साशंकता आहे.

जालना: मुस्लिम आणि दलित मतांच्या एकजुटीचा रावसाहेब दानवे यांना फटका

लक्ष्मण राऊत, लोकसत्ता

दोन वेळेस विधानसभेची आणि त्यानंतर सलग पाच वेळेस जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते रावसाहेब दानवे यांच्या पराभवामागे राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील अनेक कारणे आहेत. त्यांच्या विरोधात निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील कोणते मुद्दे आपल्या विजयासाठी कारणीभूत ठरू शकतात याचा अंदाज घेऊन प्रचार केला.

संविधानाच्या मुद्द्यावरून मागासवर्गीय आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुस्लीम मतदारांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात भावना निर्माण झाल्याचे पाहून काळे यांनी या मतदारांशी अधिक संपर्क साधला. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यात या मतांच्या अनुषंगानेही काळे यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न केले आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात आणि काळे यांच्या बाजूने भूमिका घेतली. त्याशिवाय अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना जवळपास दीड लाख मते मिळाली.

लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) असले तरी त्यापैकी एकाही ठिकाणी दानवे यांना मताधिक्य मिळाले नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत नसल्याचा मोठा फटकाही दानवे यांना बसला. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्व ओळखून या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्यात कोणतीही कसूर ठेवली नव्हती.

अमरावती: भाजपवर पुनर्बांधणीची वेळ !

मोहन अटाळकर

चुरशीच्या लढतीत अमरावती मतदारसंघातील पराभवामुळे जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांचा ऐनवेळी भाजप प्रवेश, स्थानिक नेत्यांच्या विरोधाला डावलून दिलेली उमेदवारी आणि राणा दाम्पत्याभोवती एकवटलेले प्रचारतंत्र यामुळे भाजपमधील अंतर्विरोध स्पष्ट झाला. आता बदललेल्या समीकरणाचे प्रतिबिंब आगामी काळात विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषदेतील राजकारणावर उमटणार आहे.

अमरावती जिल्ह्यात भाजपचा एकमेव आमदार आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढणे या ध्येयाने झपाटून भाजपने प्रचारतंत्र राबविले. पण, त्याचा काहीच लाभ या निवडणुकीत झाला नाही. अमरावती, तिवसा, दर्यापूर या तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार, अचलपूर, मेळघाट प्रहार जनशक्ती पक्षाकडे, मोर्शी, बडनेरामधून अपक्ष तर एकमेव धामणगाव मतदारसंघ हा भाजपकडे आहे. पण, पक्षसंघटनात्मक बांधणीवर लक्ष देण्याऐवजी भाजपने विरोधकांना जेरीस आणणाऱ्या राणा दाम्पत्याला दिलेले बळ ही भाजपच्या निष्ठावंत नेते आणि कार्यकर्त्यांसाठी आश्चर्याची बाब ठरली होती.

भाजपने मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करूनही नवनीत राणा यांना सहापैकी केवळ दोन मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळू शकले. बडनेरा मतदारसंघातून मिळालेले २६ हजारांचे मताधिक्य हे रवी राणा यांच्या वर्चस्वाची साक्ष देणारे असले, तरी अमरावतीतून विजयी उमेदवार बळवंत वानखडे यांना मिळालेली ४१ हजारांची आघाडी ही भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे.

गेल्या निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदारसंघातून राणा यांना मिळालेल्या २७ हजारांच्या मताधिक्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा वाटा होता. आगामी काळात भाजपसमोर पक्षसंघटनात्मक बांधणीचे आव्हान आहे.