गेल्या अनेक दिवसांपासून दीपाली सय्यद ठाकरे गटामध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचा शेवट आज खुद्द दीपाली सय्यद यांनीच आपण शिंदे गटात जाणार असल्याचं जाहीर करून झाला. दीपाली सय्यद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी दाखल झाल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मात्र, त्याचवेळी दीपाली सय्यद यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं. यावर टीव्ही ९ शी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर खोचक टीका केली आहे.
काय म्हणाल्या दीपाली सय्यद?
दीपाली सय्यद यांनी संजय राऊतांसोबतच रश्मी ठाकरेंनाही यावेळी बोलताना लक्ष्य केलं. “संजय राऊतांना झालेली शिक्षा ही त्यांच्या पापाची शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, याचं ते उत्तम उदाहरण आहेत”, असं दीपाली सय्यद म्हणाल्या. शिवाय, “मुंबई महानगर पालिकेतले खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना झाली आहे. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा महत्त्वाच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत”, अशीही टीका दीपाली सय्यद यांनी केली.
ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार
“१५ दिवसांत त्यांची भूमिका बदलली”
दरम्यान, दीपाली सय्यद यांच्या टीकेवर सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर देताना त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. “मला खरंच हसायला येतंय की माणसं किती चटकन बदलतात. शिवतीर्थावरचं माझं भाषण झाल्यावर आपुलकीनं दीपाली सय्यद यांनी माझं स्वागत केलं, अभिनंदन केलं. त्या म्हणाल्या की तुम्ही नारायण राणे किंवा एकनाथ शिंदेंना जे प्रश्न विचारले, ते फार चांगलं केलंत. कदाचित गेल्या १५ दिवसांत त्यांची भूमिका बदललेली असू शकते”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“करिअरसाठी अशी वक्तव्य करावी लागतात”
“या त्याच दीपाली सय्यद आहेत, ज्या हे सगळे गुवाहाटीला गेले तेव्हा त्यांच्यावर आगपाखड करत होत्या. पण हरकत नाही. मला त्यावर काही बोलायचं नाहीये. आपलं करिअर घडवण्यासाठी बऱ्याचदा अशी वक्तव्य करावी लागतात.त्या पद्धतीने त्या करत आहेत. शेवटी प्रत्येकाला करिअर करायचं आहे. त्या करिअर करत आहेत. खोके वगैरे बोलायचं तर बऱ्याचदा माणसं आरशात बघून बोलत असतात. मला वाटतं मी हा सर्व प्रकार पहिला डाव भुताचा म्हणून सोडून दिला पाहिजे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
“अजून तर प्रवेशही झालेला नाही”
दरम्यान, अजून दीपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेशही झालेला नाही, असा टोला अंधारे यांनी लगावला. “त्यांनी माझ्यावर टीका करायला हरकत नाही. मी भगिनीभाव पाळणाऱ्यांपैकी आहे. मी त्यांना ती सूट दिली आहे. पण प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अजून दीपाली सय्यद यांचा तिकडे प्रवेशही झालेला नाही. प्रवेश होण्याच्या आधी त्या घाईगडबडीत बोलल्या आहेत. कदाचित त्यांचा प्रवेश झाला नाही, तर त्या त्यांच्या शब्दावरून पलटूही शकतात. काही सांगता येत नाही”, अशी खोचक टीका अंधारे यांनी केली.