राज्यात तीन महिन्यांपूर्वी सत्तापालट झाला. एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यात आता शिवसेनेला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणखी एक धक्का बसला आहे. दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
दीपाली सय्यद आज ( ९ नोव्हेंबर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचल्या होत्या. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण स्वीकारणार, असेही सय्यद यांनी म्हटलं. यावेळी सय्यद यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पक्ष फुटीसाठी जबाबदार धरत टीका केली आहे.
“संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा झाली आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जातो, याचं उत्तर उदाहरण संजय राऊत आहेत. संजय राऊत यांच्यामुळे दोन गट पडले आहेत. तसेच, एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उभे राहणं कर्तव्य आहे,” असे दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : “पहिला डाव भुताचा समजून…”, दीपाली सय्यद यांच्या टीकेवर सुषमा अंधारेंचा खोचक टोला!
“रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. रश्मी ठाकरे खऱ्या सूत्रधार आहेत,” असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला.