व्हिसासाठी बनावट कागदपत्रे दिल्याच्या आरोपावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या देवयानी खोब्रागडे यांनी ‘आदर्श’मध्येही बनावट कागदपत्रांच्या आधारे तसेच माहिती दडवून सदनिका घेतल्याचे उघडकीला आले आहे. ‘आदर्श’ चौकशी आयोगाने ‘बेस्ट’चे तत्कालीन महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी या सोसायटीला नियमबाह्य़रीत्या मदत करून स्वत:च्या मुलीला सदनिका मिळवून दिल्याचे अहवालात म्हटले आहे.
आदर्श सोसायटीतील १०२ सभासदांपैकी २५ सभासद विविध निकषांची पूर्तता न करणारे (अपात्र) असून केवळ ७८ सभासद पात्र ठरले आहेत. अपात्र सदस्यांमध्ये भारताच्या परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व. बाबासाहेब कुपेकर, व्हाइस अॅडमिरल (निवृत्त) मदनजितसिंग, सुरेश प्रभू (माजी केंद्रीय मंत्री), आदित्य पाटील, डॉ. अर्चना तिवारी, डॉ. एस.बी. चव्हाण, सीमा विनोद शर्मा, गिरीश प्रवीणचंद मेहता, संजय शंकरन, डॉ. संजय रडकर, कैलास गिडवाणी, भावेश अंबालाल पटेल, अभय परमवीर संचेती (भाजपचे खासदार संचेती यांच्याशी संबंधित), मदनलाल शर्मा, शिवाजी शंकर काळे, रुपाली रावराणे, रणजीत संगीतराव, कॅ. प्रवीणकुमार, भगवती शर्मा, सुमीला सेठी, माजी आमदार कृष्णराव भेगडे, कमांडर जॉन मॅथ्यूज, निवृत्ती भोसले, डॉ. अरुण डवले यांचा समावेश आहे.
देवयानी खोब्रागडे यांनी ‘आदर्श’चे सदस्यत्व स्वीकारताना आपल्या नावावर मुंबईत इतरत्र कुठेही घर नसल्याचे शपथपत्रावर लिहून दिले होते. मात्र ज्या दिवशी त्यांनी हे सदस्यत्व घेतले, त्यापूर्वीच ओशिवरा येथील मीरा सहकारी गृहनिर्माण संस्थेत त्यांना ‘म्हाडा’कडून १७०१ क्रमांकाची सदनिका मिळाल्याचे चौकशीत आढळून आले. ‘आदर्श’मध्ये सदनिका मिळाल्यावर मीरा सोसायटीच्या सभासदत्वाचा राजीनामा देऊ, असे त्यांनी ‘आदर्श’चे सदस्यत्व स्वीकारताना आयोगाला सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात २००४ साली ‘आदर्श’मध्ये फ्लॅट घेणाऱ्या खोब्रागडे यांनी ३० सप्टेंबर २००८ मध्ये ‘मीरा’ सोसायटीतील फ्लॅट विकला असेही निदर्शनास आले.
देवयानी यांनीही ‘आदर्श’ फ्लॅट लाटला
व्हिसासाठी बनावट कागदपत्रे दिल्याच्या आरोपावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या देवयानी खोब्रागडे यांनी ‘आदर्श’मध्येही बनावट कागदपत्रांच्या आधारे तसेच माहिती दडवून सदनिका घेतल्याचे उघडकीला आले आहे.
First published on: 21-12-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diplomat devyani khobragade ineligible for owning adarsh flat says panel