शतावरीची लागवड करण्यास प्रोत्साहित करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील शिवाई ॲग्रो हेल्थ कंपनीच्या संचालकांना पोलीसांनी शनिवारी अटक केली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी संशयितांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पलूस पोलीस ठाणेस फिर्यादी शिवाजी सावंता माळी (रा. पलूस) तसेच साक्षीदार शेतकरी यांना शिवाई ॲग्रो हेल्थ कंपनी पुणे या कंपनीचे संचालक मनोज काळदाते (वय ४९ वर्षे रा. धायरी) माधव गायकवाड (रा ससाणेनगर), गणेश निंबाळकर (वय ३२, रा. विट ता.करमाळा) आणि प्रविण अलई (रा.नाशिक) यांनी कंपनीकडुन शतावरी पिकाची लागवड करण्यास सांगितले. प्रति रोप १ रुपयाप्रमाणे मिळत असताना कंपनीतील संचालकांनी २० रुपये प्रति रोपाप्रमाणे दिली. तसेच पिकाची वाढ झाल्यानंतर २५०/- रु. प्रति किलोप्रमाणे घेवुन जातो असे सांगुन पिकाची वाढ झालेनंतर ठरले दराप्रमाणे शतावरीचे तयार पिक घेवुन गेले नाहीत. यामुळे सुमारे पंधरा लाखाची फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली होती.
सदर आरोपी यांचे भ्रमणध्वनी लहरीवरुन स्थान निश्चिती मिळाले नंतर पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले , उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सुरेंद्र धुमाळे, दिलीप गोरे, प्रमोद साखरपे यांचे विशेष पथक तयार करून आरोपीचे शोधाकरीता पुणे सोलापुर येथे रवाना केले.
पथकाने सदर गुन्हयातील आरोपी मनोज काळदाते यांना पुण्यातून व गणेश निंबाळकर सोलापुर येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून दोघांनाही ८ ऑगस्ट अखेर आरोपी पोलीस कस्टडी रिमांड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंजूर केला.