मदतीचे हात पसरूनही निराशाच; परिवारासह अपंग मजूर कुटुंबासह उत्तरप्रदेशच्या वाटेवर

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : करोनानी आता मजुरांची पुरती दैना उडवली आहे. एकीकडे वाढती टाळेबंदी उपासमारीकडे लोटत आहे तर दुसरीकडे सरकारी यंत्रणा तोकडय़ा पडत आहेत. अशातच आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हजारो मजूर मिळेल तो मार्ग पत्करून आपल्या मूळ गावी जात आहेत. असाच एक वसईतील ५२ वर्षीय अपंग टाळेबंदीच्या काळात आर्थिक संकटाने हैराण होऊन गावी जाण्यासाठी निघाला आहे. कोणताही पर्याय नसल्याने त्याने आपल्या चाकांच्या खुर्चीला आपले वाहन बनवले आहे तर त्याचा परिवार पायी उत्तरप्रदेशकडे निघाला आहे. त्याच्या सोबत त्याची पत्नी आणि मुलगी आहे.

वसईच्या खान कंपाऊंडमध्ये राहणारा ५४ वर्षीय दिलशाद खान हा भाकरीच्या लढाईसाठी २० वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. सुरुवातीला मिळेल ती कामे करून उदरनिर्वाह करत होता. त्यानंतर वसईत एका कंपनीत मजूर म्हणून काम मिळाल्याने तो वसईत स्थायिक झाला. याने अनेक ऊन-पावसाळे पाहिले पण अशी परिस्थिती कधीच ओढवली नाही. या टाळेबंदीत त्याचे तर काम गेले पण मुलगीही मागील दोन महिन्यांपासून घरीच आहे. यामुळे आता परिवाराचे पोट कसे भरायचे यामुळे आपल्या मूळ गावी जाऊन काहीतरी करता येईल म्हणून त्याने गावी जाण्याचा निर्णय घेतला.

३ मेपासून सरकारी यंत्रणेत गावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खान याने दिलेल्या माहितीनुसार मागील महिनाभरापासून आपल्या मूळ गावी कानपूर येथे जाण्यसाठी धडपड सुरू आहे. यासाठी अनेक ठिकाणी फेऱ्या मारल्या. पण काही झाले नाही. ऑनलाइन अर्ज करण्याचे कुणी सांगितले तर पैसे देवून ते पण केले. कुणी सांगितले की पोलीस ठाण्यात जावून मदत माग, तर पोलीस ठाण्यात चकरा मारल्या, नुकत्याच उत्तरप्रदेशला जाणऱ्या रेल्वे गाडय़ा सुरू झाल्या आहेत.  तर त्यांनी तहसील कार्यालयाच्या चकरा मारल्या. शेवटी टेम्पो, ट्रक जात असल्याची माहिती मिळाली पण त्याचे भाडे ५००० रुपये आहे. तीन जणांचे इतके पैसे कुठून आणणार म्हणून शेवटी त्याने आपल्या चाकांच्या खुर्चीलाच आपले वाहन बनविले आणि शनिवारी रस्त्याने रणरणत्या उन्हात पायी गावी जाण्याचा निर्णय घेतला. पत्नी व मुलीसह तो मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून आपल्या मूळगावी कानपूरकडे रवाना झाला आहे. रस्त्यात जे मिळेल ते खावू, कुणाला मागून खावू पण गावी जावू असे सांगत दिलशाद खान डोक्यावर आभाळ घेत वसईतून निघाला आहे. रस्त्यात त्याचा हा जिगरबाज निर्णय पाहून अनेकजन आता त्याला रस्त्यात मदत करत आहेत.

Story img Loader