आज सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ रेल्वेमार्गासाठी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी किती कोटी रुपये मंजूर केले शिवाय,  यवतमाळ-मूर्तीजापूर-अचलपूर व पुलगाव-आर्वी या शकुंतला नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली की नाही, याबाबतचा कोणताच उल्लेख त्यांच्या भाषणात नसल्याने विदर्भ आणि मराठवाडय़ातील जनतेच्या तोंडाला रेल्वेमंत्र्यांनी पाने पुसली, अशीच प्रतिक्रिया आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या सेना खासदार भावना गवळी यांनी व दिवंगत पत्रकार सुधाकर डोइफोडे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, खासदार विजय दर्डा यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. आता नरेंद्र मोदी सरकारात सेनेचाही वाटा असल्याने रेल्वेसंबंधीच्या आपल्या मागण्या रेल्वे अर्थसंकल्पात दिसतील, अशी आशा खासदार गवळी यांनी रेल्वेमंत्र्यांना आठ दिवसांपूर्वी भेटल्यानंतर व्यक्त केली होती. पश्चिम विदर्भ आणि मराठवाडय़ातील नागरिकांसाठी जीवनदायी, असा उल्लेख करण्यात येत असलेल्या वर्धा-नांदेड-व्हाया यवतमाळ या नवीन रेल्वेमार्गाचे काम सहा वर्षांंपासून सुरू आहे. मात्र गंमत अशी की, हा कालावधी लोटला तरी या रेल्वेमार्गाचे काम फक्त ३.७ टक्केच झाले आहे. वर्धा-नांदेड-व्हाया यवतमाळ या २७० कि.मि.लांबीच्या प्रकल्पाचा खर्च तेव्हा २७४ कोटी ५५ लाख रुपये अपेक्षित होता. या प्रकल्पावर खर्च होणाऱ्या रकमेच्या ४० टक्के रक्कम राज्य सरकार आणि ६० टक्के रक्कम केंद्र सरकार खर्च करणार आहे.   आज या प्रकल्पाची किंमत ७३५ कोटी रुपयांवर गेली आहे. राज्य सरकार प्रकल्पाची काही कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करणार आहे. जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे, तर सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. विदर्भातच नव्हे, तर साऱ्या भारतात कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्या थांबवण्यासाठी वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ हा रेल्वे प्रकल्प आशेचा किरण आहे, पण तो या जन्मात पूर्ण होईल की नाही, या शंकेने विदर्भ आणि मराठवाडय़ातील जनता त्रस्त असल्याचे निराशादायी चित्र असतांना आता नव्या मोदी सरकारच्या सत्तारूढ होण्याने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, पण याही सरकारला पशांचे सोंग आणता येत नाही, याची जाणीव झाली आहे.    
‘शंकुतला’ या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ-मूर्तीजापूर, पुलगांव-आर्वी आणि मूर्तीजापूर-अचलपूर या विदर्भातील तीन नॅरोगेज रेल्वे आजही ब्रिटिश कंपनी ‘क्लिक निक्सन’ यांच्या ताब्यात असून या कंपनीशी भारत सरकारचा करार झालेला आहे. यात तीनही मार्गाचे रूपांतर ब्रॉडग्रेजमध्ये करण्याची मागणीही दुर्लक्षित झाली आहे. शंकुतलाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होण्यासाठी एक याचिकासुध्दा संसदेच्या याचिका समिती समोर दाखल झाली आहे. समितीचे अध्यक्ष खासदार अनंत गीते यांच्यासमोर तीनदा सुनावणी झाली आहे. मूर्तीजापूर-अचलपूर ही रेल्वे बंद आहे, तर पुलगाव-आर्वी रेल्वे केवळ बंदच नाही, तर या मार्गावरील रूळ उखडला आहेत. या तीनही शकुंतलांचे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतर होणार असल्याचा जो विश्वास खासदार भावना गवळींनी व्यक्त केला होता तोही   रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी फोल ठरवला आहे. विशेष हे की, देवेगौडा पंतप्रधान असो किंवा आता सदानंद गौडा रेल्वेमंत्री असो ‘शंकुतला’च्या नशिबात असलेला वनवास मात्र कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा