सोलापूर : जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते आणि आक्षेपार्ह वर्तनामुळे वादग्रस्त ठरलेले जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पाठविलेला प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी फेरपडताळणीसाठी पुन्हा शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. प्रस्तावातील प्रत्येक मुद्याची सखोल आणि नैसर्गिक न्यायाने चौकशी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माढा तालुक्यातील परितेवाडी येथील कदमवस्तीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक डिसले यांना यापूर्वी युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनने जागतिक शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते. परंतु या पुरस्कारासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेतली नाही. पुरस्कार दिलेल्या संस्थेकडून झालेला पत्रव्यवहार डिसले यांनी चौकशी समितीला सादर करण्यास नकार दिला आहे. पुरस्कारासाठी सादर केलेली छायाचित्रे, चित्रफिती, स्वत:चे पारपत्र, ई-मेल इत्यादी माहितीही सादर करण्यास त्यांनी नकार दिला होता. १७ नोव्हेंबर २०१७ ते ५ ऑक्टोबर २०२० या कालावधीत डिसले हे मूळ आस्थापनेत (परितेवाडी जि. प. शाळा) गैरहजर होते. या दरम्यान जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्रतिनियुक्तीवर होते. परंतु तरीही तेथे गैरहजर राहिले. डिसले मार्च २०१७ मध्ये दहा दिवस विशेष क्यूआर कोडेड पुस्तकांचा प्रकल्प कॅनडामध्ये सादरीकरणासाठी अध्ययन कार्याकरिता रजेवर गेले होते. याव्यतिरिक्त त्यांनी कोणतीही रजा वरिष्ठ कार्यालयाकडून घेतली नव्हती. डिसले यांचे परदेश दौरे पूर्णत: खासगी होते, असे लेखी म्हणणे देताना त्यांचे पारपत्र पडताळणीसाठी देण्यास नकार दिला होता.
अडचणींत वाढ.. अमेरिकेतील विद्यापीठाची फुलब्राईट अभ्यासवृत्ती डिसले यांना मिळाल्यानंतर त्यानुसार अमेरिकेत जाऊन संबंधित विद्यापीठात शैक्षणिक संशोधनासाठी मागितलेल्या सहा महिन्यांच्या अध्यापन रजा प्रकरणात ते सर्वप्रथम अडचणीत आले. नंतर या अडचणी वाढतच गेल्या आहेत.