सातारा: सातारा मध्यवर्ती बस स्थानकासमोर रविवारी सायंकाळी मालमोटारच्या धडकेत एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर सातारा वाहतूक पोलीस शाखेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला होता. या अपघातानंतर बसस्थानकासमोर वाहतूक पोलिसांनी शिस्त लावत रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळी सात ते अकरा या वेळेत आणि दुपारी चार ते सात यावेळेत बसस्थानकासमोर मोठी गर्दी असते. येथून राज्यात सर्वत्र बसची आवक-जावक होते. त्यातच या मार्गावर रिक्षा आणि छोटे-मोठे विक्रेत्यांमुळे अडथळे निर्माण होत होते. बस स्थानकासमोर दररोजची होणारी वाहतूक कोंडी, मोठी गर्दी, यामुळे सतत वाहतूक पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. मात्र, यामध्ये सुधारणा होत नव्हती. रविवारी बसस्थानकासमोरच एक अपघात झाला. या अपघातात मालमोटारच्या धक्क्यात एका माजी सैनिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे वाहतूक पोलिसांना जाग आली.
रस्त्याकडेला लागलेल्या रिक्षा आता रिक्षा थांब्यात बंदिस्त झाल्या. त्यामुळे रस्ता वाहतुकीस खुला झाला. गर्दी कमी झाली. रस्ता मोठा आणि मोकळा दिसू लागला. हा सारा बदल निवृत्त जवानाच्या मृत्यूनंतर झाला.
सातारा बसस्थानक परिसर नेहमीच वर्दळीचा असतो. हजारो प्रवासी ये-जा करतात. यातच बसस्थानकाबाहेर प्रवेशद्वाराजवळचा रिक्षा थांबा सोडून अन्यत्र उभ्या केलेल्या असतात. रस्त्यावरील अडथळ्यांमुळे रस्ता अरूंद होत होता. वाहतूक पोलिसांनी तातडीने पावले उचलून अडथळे दूर केले व रिक्षा बसस्थानक जवळच्या रिक्षा थांब्यातच बंदिस्त केल्या आहेत. हा बद्दल कायमस्वरूपी राहावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.