काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-यासांगली लोकसभा मतदारसंघात माजी आमदार हाफिज धत्तुरे यांची बंडखोरी झाल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, या बंडखोरी पाठीमागील ‘ब्रेन’ कोणाचा हाच प्रश्न चक्रावून टाकणारा ठरला आहे. मर्यादित ताकदीवर धत्तुरे यांनी दाखल केलेली उमेदवारी निश्चितपणे सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणू  शकते याची जाणीव जिल्ह्यातील सर्वच पक्षांतील राजकीय कार्यकर्त्यांना ज्ञात आहे. त्यामुळे राजकीय पटलावरील संदर्भ बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
सर्वसामान्य जनतेत आम आदमी म्हणून ओळख असणा-याहाफिज धत्तुरे यांनी केलेली बंडखोरी भल्याभल्यांना चक्रावणारी ठरली आहे. धत्तुरे हे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे निष्ठावान कार्यकत्रे म्हणून ओळखले जातात. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांपासून डॉ. कदम, हर्षवर्धन पाटील आदींनी अखेपर्यंत प्रयत्न केले. मात्र राजकीय दबाव येण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन दिवस ते भूमिगत राहिले. चिन्हवाटपाच्या वेळीही ते अथवा त्यांचे कार्यकत्रे निवडणूक कार्यालयात अनुपस्थित राहिले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित घोरपडे यांनी अपक्ष म्हणून लढत दिली होती. त्या वेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची कुमक मिळाली होती. यामागे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची खेळी असल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार केला जात होता. मात्र या वेळी खुद्द काँग्रेसमधूनच बंडखोरी झाल्याने या आरोपातून जयंत पाटील अलिप्त झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र रिंगणातून माघार घेऊन आपण आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.
धत्तुरे यांना विधानसभा निवडणुकीवेळी सर्वतोपरी मदत करणारे डॉ. पतंगराव कदम त्यांची बंडखोरी टाळण्यासाठी या वेळी असमर्थ ठरले. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे नेमका ब्रेन कोणाचा हा प्रश्न राजकीय वर्तुळात चíचला जात आहे. बंडखोरी टाळणे अशक्य असल्याचे लक्षात येताच सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी धत्तुरे यांच्या बंडखोरी पाठीमागे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप करून पक्षांतर्गत मतभेदाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केल्याचा वास येत आहे. कोणीही विचारले नसताना भाजपच्या माथी आरोप करण्याचा अट्टहास कशासाठी, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सांगली-मिरजेत असणा-याअल्पसंख्याकांची मते ही काँग्रेसची पारंपरिक पुंजी आहे. धत्तुरे यांच्या उमेदवारीमुळे या पारंपरिक मतांवरच घाला बसण्याचा धोका काँग्रेसला भेडसावतो आहे. याला आता कसा पायबंद घातला जाईल यावरच पुढची राजकीय गणिते मांडता येणार आहेत.