मायावतींच्या कस्तुरचंद पार्क मैदानावरील सभेसाठी लाल किल्ल्याची प्रतिकृती असलेले व्यासपीठ उभारले होते व त्यासाठी तब्बल २० लाख रुपये खर्च करण्यात आले. होर्डिग्ज आणि जाहिरातबाजीवरही लाखो रुपये खर्च करण्यात आले.
शहराच्या महत्त्वाच्या भागात विशेषत: उत्तर नागपूरमध्ये दलितांच्या वस्त्यांमध्ये बसपाचे मोठेमोठे होर्डिग्ज लावून सभेसाठीच्या प्रचारावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. मायावतींचा मुख्य उद्देश विदर्भातून ‘इलेक्शन फंड’ गोळा करण्याचा होता. मात्र, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
शनिवारीच मायावती नागपुरात आल्या आणि एका पॉश हॉटेलात त्यांनी मुक्काम केला. लाखोंची सभा घेऊन मायावती विदर्भात स्वत:ची ताकद दाखवून देण्यासाठी आल्या होत्या. यात बऱ्याच अंशी त्या यशस्वीसुद्धा झाल्या आहेत. मायावतींनी कस्तुरचंद पार्क मैदानावर जंगी सभा घेऊन आपल्या राजकीय ताकदीची चुणूक दाखविली. सभेसाठी ट्रकच्या ट्रक भरून लोकांना आणण्यात आले. यासाठीही प्रचंड पैसा खर्च करण्यात आला. मायावतींनी दिल्ली काबीज केली असून त्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करीत आहेत, असे भासविण्यासाठी लाल किल्ल्याच्या आकाराच्या व्यासपीठावर २० लाख रुपये खर्च करण्यात आले. नागपुरातील बडे डेकोरेटर दिगंबर बागडे यांनी हे व्यासपीठ तयार केले होते आणि त्यासाठी लागलेल्या खर्चालाही त्यांनी दुजोरा दिला. बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे व्यासपीठ वॉटरप्रूफ होते. यासाठी दोन ट्रक थर्माकोलचा वापर करण्यात आला. संपूर्ण सेट तयार करण्यासाठी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातील २५ आर्टिस्ट गेल्या ५ फेब्रुवारीपासून रात्रंदिवस राबत होते. खुद्द बागडे यांनी सेट अत्यंत सुंदर दिसावा, यासाठी एक आठवडा मैदानातच मुक्काम ठोकला होता. ही प्रतिकृती लालकिल्ल्याची असली तरी बागडे यांनी अद्याप लाल किल्ला प्रत्यक्षात पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी नेटवरून याची छायाचित्रे डाऊनलोड केली आणि त्यानुसार प्रतिकृती उभारण्याचे काम आर्टिस्टला दिले. बसपाचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींच्या दोन प्रतिकृतीही यात दोन्ही बाजूला उभारण्यात आल्या होत्या.
बसपचे राज्यसभा सदस्य, महासचिव व महाराष्ट्र प्रभारी वीर सिंग यांनी सभेसाठी झालेल्या खर्चाची माहिती देण्यास नकार दिला. परंतु, पक्षाच्या अंतस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ कोटी रुपये सभेवर खर्च झाला आहे. राज्यभरातून १ हजार खास कार्यकर्ते फंड गोळा करण्यासाठी राबत होते. त्यांना तेच काम देण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, नांदेड, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर येथून या कार्यकर्त्यांना आणण्यात आले. नागपूर बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांना सभास्थळी नेण्यासाठी रेल्वे स्टेशन, एसटी स्थानकावर कार्यकर्ते तैनात करण्यात आले होते.
सभेपेक्षा वीस लाखांच्या व्यासपीठाचीच चर्चा
मायावतींच्या कस्तुरचंद पार्क मैदानावरील सभेसाठी लाल किल्ल्याची प्रतिकृती असलेले व्यासपीठ उभारले होते व त्यासाठी तब्बल २० लाख रुपये खर्च करण्यात आले. होर्डिग्ज आणि जाहिरातबाजीवरही लाखो रुपये खर्च करण्यात आले.
First published on: 18-02-2013 at 04:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion of stage expenditure inspite of meeting