सोलापूर : २००९ मधील मार्चमध्ये मुंबईत एका आलिशान सोहळ्यात टाटा मोटर्स कंपनीने सामान्य मध्यमवर्गीयासही परवडेल अशा अवघ्या एक लाख रुपये किमतीत टाटा नॅनो मोटार बाजारात आणली. त्याचे संपूर्ण विश्वाला मोठे अप्रूप वाटले. मोटार उद्योगात क्रांतिकारी ठरलेल्या या घटनेवर जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्र काढल्याचे रतन टाटा यांना समजले. त्या वेळी ते व्यंगचित्र पाहता आले नाही. परंतु नंतर काही दिवसांत त्यांनी आर. के. लक्ष्मण यांना कृतज्ञता म्हणून आभाराचे पत्र पाठवले होते. या घटनेचे साक्षीदार असलेले निवृत्त आयपीएस अधिकारी हरीश बैजल यांनी या आठवणीला उजाळा दिला.

आपल्या अलौकिक कर्तृत्वाने टाटा उद्योगसमूहाची जागतिक नाममुद्रा निर्माण केलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण जगात हळहळ व्यक्त होत असताना त्यांच्या सभ्य, सुसंस्कृत, सालस व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. बैजल यांनी टाटा यांच्या या अशाच आठवणी सांगताना वरील आभार पत्राचे स्मरण दिले.

हेही वाचा – शब्दास्त्रांचे शिलांगण? शिंदे, ठाकरे, मुंडे, जरांगे यांच्या मेळाव्यांतून प्रचाराचे रणशिंग

बैजल हे २००९ मध्ये मुंबईत वाहतूक नियंत्रण शाखेत उपायुक्तपदी कार्यरत होते. त्याच सुमारास टाटा मोटर्स कंपनीने सामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे चारचाकी मोटार खरेदी करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी अवघ्या एक लाख रुपये किमतीत टाटा नॅनो मोटार बाजारात आणली होती. तत्पूर्वी, या गाडीची चाचणी आणि परवानगीच्या प्रक्रिया पूर्ण करताना, त्यात मुंबई पोलीस वाहतूक शाखेचा संबंध आला असता सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले गेले. यातूनच टाटा मोटर्स कंपनीचे उपाध्यक्ष कृष्णकांत, विपणन विभागाचे प्रमुख देबाशिष रे आणि नॅनोचे डिझाईन केलेले गिरीश वाघ यांच्याशी संबंध निर्माण झाले. जेव्हा टाटा नॅनो मोटार बाजारात आणण्यासाठी मुंबईत आलिशान सोहळा झाला, त्या वेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपणांस सन्मानाने आमंत्रित करून साक्षात रतन टाटा यांच्यासमोर उभे केले. त्याच दिवशी प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’चे पंचतारांकित हॉटेलच्या पगडीधारी दरबानाने मोटारीचा दरवाजा उघडून स्वागत करतानाचे ते व्यंगचित्र होते. त्याची माहिती आपण रतन टाटा यांना दिली असता, त्यांनी दिवसभराच्या घाई गडबडीत हे व्यंगचित्र पाहता आले नसल्याचे कबूल केले.

हेही वाचा – महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज!

बैजल हे त्या वेळी वरळीतील पोलीस वसाहतीत राहत असताना नियमितपणे समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी जायचे. तेथे आर के लक्ष्मण यांची कन्या उषा लक्ष्मण यांची ओळख झाली. त्या वेळी टाटा नॅनो मोटार अनावरण सोहळ्याप्रसंगी प्रत्यक्ष रतन टाटा यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ समोर आला. तेव्हा उषा लक्ष्मण यांनी सुखद आश्चर्य व्यक्त करीत, रतन टाटा यांनी आपले पिता आर के लक्ष्मण यांना टाटा नॅनो मोटारीच्या अनुषंगाने चितारलेल्या क्रांतिकारी व्यंगचित्राबद्दल कृतज्ञतापर पत्र पाठवल्याची माहिती दिली. तेव्हा बैजल यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि रतन टाटा यांच्यातील सभ्यता, सुसंस्कृतपणा, सालस आणि सोज्वळपणा या सद्गुणांचे दर्शन घडले.