केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधी बोलताना केलेल्या गंभीर आरोपांमुळे पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरण चर्चेत आलं आहे. दिशा सालियनची हत्या करण्यात आली असून हत्येआधी बलात्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला होता. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिल्यानंतर आयोगाने मालवणी पोलिसांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी काही ट्वीट करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत देणारी टीका केलीय. मात्र या टीकेवर आता रुपली चाकरणकर यांनी उत्तर दिलंय.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या होत्या…
“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियन या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियन हिची बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियन यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत,” असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं होतं.
नितेश राणे यांनी काय टीका केली?
नितेश राणेंनी या प्रकरणामध्ये मालवणी पोलिसांच्या तपासाबद्दल शंका घेणारी आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं संकेत देणारी ट्विट आज केली. “मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आणि आता त्यांना दिशा सालियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणाऱा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही?,” असा सवाल नितेश राणेंना विचारला आहे.
“मुंबईच्या महापौरांनी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झालं नाही अंस दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. चला किमान ते आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
“दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आलं. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आलं. संबंध?,” अशी शंका नितेश राणेंनी उपस्थित केली आहे.
“मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. बरोबर ना? आणि आता याच पोलिसांना महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे? हे किती योग्य आहे? नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे?,” अशी विचारणा नितेश राणेंनी केली आहे.
नितेश राणेंना चाकणकर यांनी दिलं उत्तर…
संबंधित प्रकरणाचा अहवाल मालवणी पोलिसांकडून का मागवण्यात आला यासंदर्भात रुपली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “ही जी तक्रार आहे त्याचा प्राथमिक तपास मालवणी पोलीस स्थानकामध्ये झाला आहे. त्यामुळे मालवणी पोलीस स्थानकाचा अहवाल काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे. तो अहवाल आल्यानंतर त्या अहवालामध्ये किती तथ्य आहे, नाही याची सुद्धा निश्चित चाचपणी केली जाईल. त्यानंतर पुढे कशी तपासणी करता येईल यासंदर्भात बोलता येईल,” असं रुपाली चाकणकर म्हणाल्यात.
महिला आयोग कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपांवरही दिलं उत्तर…
याच वेळेस पत्रकारांनी, महिला आयोग कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप होतोय, असं विचारलं असता त्यावरही चाकणकर यांनी उत्तर दिलंय. “महिला आयोग कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीय. आपल्याकडे जी तक्रार आलीय त्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा अशापद्धतीने तिची बदनामी होते हे खेदजनक आहे. या प्रकरणातील तथ्य काय आहे. संबंधित व्यक्तीच्या आई-वडिलांनी देखील तक्रार केलेली आहे. ही तक्रार कधी आली, या तक्रारीमध्ये त्यांचं म्हणणं काय आहे हे प्राथमिक तपासात समजणार. हा तपास मालवणी पोलिसांकडे आहे. म्हणून आपण त्यांच्याकडून हा अहवाल मागून घेतलाय,” असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
कोणालाही नोटीस नाही…
तसेच पुढे बोलताना, “यासंदर्भात अद्याप कोणाला नोटीस दिलेली नाही. ४८ तासांमध्ये मालवणी पोलिसांचा अहवाल येणार असून तो महत्वाचा आहे. त्या अहवालामधून समोर येईल त्या माहितीनुसार त्यामधील काही व्यक्ती किंवा तपासावर आधारीत काही ठरवता येईल,” असं चाकणकर म्हणाल्यात.
नारायण राणेंनीही दिलाय इशारा…
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता. “खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस” आणि आपण कुठे धावणार?,” असे राणेंनी म्हटले होते.
बलात्कार होत असताना बाहेर पोलीस सुरक्षा कुणाची होती
“आमच्याकडेही काही कागदपत्र आहेत. महाराष्ट्रात काही घटना घडल्या. ८ जूनला दिशा सालियानची बलात्कार करून हत्या केली. सांगितलं गेलं आत्महत्या केली. एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती. तिला जबरदस्तीनं बोलावलं. तिचा मित्र रोहन राय यानं. त्यानंतर तिला थांबायला सांगितलं, ती थांबली नाही. ती घरी निघाली. त्यानंतर कोण कोण होते, पोलीस सुरक्षा कुणाला होतं, तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलीस सुरक्षा कुणाची होती. तिच्या पोस्ट मॉर्टमचा अहवाल अजून बाहेर का आलेला नाही? ७ महिने झाले, अजून अहवाल का बाहेर आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची, त्या इमारतीच्या रजिस्टरची ८ जूनची पानं का नाहीत? कुणी फाडली?,” असा सवाल नारायण राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता.
हत्या करण्यात आली तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती?
“त्यानंतर दिशा सालियन, सुशांतसिंहला जेव्हा कळलं, तेव्हा तो कुठएतरी बोलला की मी यांना सोडणार नाही. मग काही लोक त्याच्या घरी गेले. घरात जाऊन बाचाबाची झाली दिशा सालियानवरून. त्या बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही गायब कसे झाले? १३ जूनला रात्री सीसीटीव्हीचे कॅमेरे नव्हते. आधी होते असं सोसायटीतले लोक सांगतात. ठराविक माणसाची अँब्युलन्स कशी आली? ती कुणी आणली? रुग्णालयात कुणी नेलं? पुरावे नष्ट कुणी केले? याची चौकशी होणार. त्यात कोणते अधिकारी होते, तेही आता तिथे राहिलेले नाहीत. तेही आता सगळं उघडं करतील,” असेही नारायण राणे म्हणाले होते.