Aditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार आहे. यासंदर्भातला आदेश आजच येण्याची चिन्हं आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे अशी माहिती समोर येते आहे.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काही आमदार करत होते. त्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणात तुरुंगात जातील असं वक्तव्य केलं होतं. टीव्ही ९ मराठीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
आशिष शेलार यांनी काय म्हटलं आहे?
“दिशा सालियन प्रकरणात संशयाचं धुकं निर्माण झालं आहे. माझं म्हणणं असं आहे जर एसआयटी चौकशीची मागणी झाली असेल तर आदित्य ठाकरेंनी स्वतः या चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. त्यांनी स्वतः या चौकशीला सामोरं गेलं पाहिजे.” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
विनायक राऊत काय म्हणाले?
“सध्याचं शिंदे सरकार म्हणजेच मिंधे सरकार हे कपटी वृत्तीने काम करणारं सरकार आहे. मातोश्री, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची जी लोकप्रियता वाढली आहे त्याला लगाम घालण्यासाठी विनाकारण कुठल्या तरी प्रकरणी अडकवायचं हा प्रकार सुरु आहे. दिल्लीकरांना खुश करण्यासाठी शिंदे सरकार हे सगळं करतं आहे. मात्र त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.” असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे एसआयटी चौकशी नेमली जाते आहे. काही पुरावे गृहखात्याच्या हाती आले आहेत. जे निर्दोष आहेत त्यांची सुटका होईल” असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत.
दिशा सालियन प्रकरण काय आहे?
मुंबईतली टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला. ८ जूनच्या रात्री मुंबईतल्या मालाड येथील गॅलेक्सी रिजेंट या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच ११ जून २०२० ला दिशाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. दोन दिवस विलंब का झाला? हा प्रश्न उपस्थित होत होता. आता या प्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होण्याची चिन्हं आहेत.