Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका काही दिवसांपूर्वी दाखल केल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. दिशा सालियनची आत्महत्या नाही तर हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, यानंतर आज दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा यांनी ही तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे हे देखील दिशा सालियन प्रकरणात आरोपी असल्याचा गंभीर आरोप वकील निलेश ओझा यांनी केला आहे.

वकील निलेश ओझा काय म्हणाले?

“आम्ही याआधीही म्हटलं होतं की जेव्हा एखाद्या प्रकरणात एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असतो, तेव्हा अशा प्रकारे तक्रार द्यावी लागते. आम्ही आज मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्याकडे तक्रार दिली आहे. आता आमच्याकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आम्ही केलेली तक्रारच एफआयआर आहे. आता पुढची जबाबदारी पोलिसांची आहे. आता पोलीस आरोपींवर कधी कारवाई करतात हे पाहावं लागेल”, असं वकील निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.

“आम्ही जी तक्रार दिली तिच एफआयआर आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, दिनो मोरया, सूरज पांचोली, तसेच त्यांचे सुरक्षा रक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रावर्ती हे सर्व लोक आमच्या तक्रारीनुसार आरोपी आहेत. या प्रकरणात जेव्हा आदित्य ठाकरे यांचं नाव आलं, तेव्हा परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अशी स्टोरी सांगितली की आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले आहेत. यामध्ये कोणताही राजकीय नेता त्या ठिकाणी आलेला नव्हता असं परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद सांगितलं होतं, म्हणजे परमबीर सिंह यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप निलेश ओझा यांनी केला.

‘आदित्य ठाकरेंचा ड्रग्सच्या व्यापारात सहभाग’ : निलेश ओझा

दरम्यान, वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्सच्या व्यापारात सहभाग असल्याचा आरोप निलेश ओझा यांनी केला आहे. तसेच डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांचं संभाषण झाल्याचा दावा ओझा यांनी केला आहे.

“तसेच आम्हाला फक्त दोन गोष्टी सिद्ध करायच्या आहेत की दिशा सालियान प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा त्या ठिकाणी आदित्य ठाकरे हे तिथे होते की नव्हते? दिशा सालियानचा मृत्यू हा नैसर्गिक नाही. त्यामध्ये अनेक संशयास्पद कारणं असल्याचं दिसत आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांनी याबाबत दिलेले स्पष्टीकरण हे खोटे आहे. आमच्याकडे काही प्रत्यक्षदर्शी देखील आहेत. आम्ही फक्त आता नावे सांगत नाहीत”, असं निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “या प्रकरणात उद्धव ठाकरे देखील आरोपी आहेत”, असा आरोप वकील निलेश ओझा यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला म्हणून ते देखील आरोपी आहेत, असंही ओझा म्हणाले.

‘स्टिव्ह पिन्टो गायब झाला…’

दिशा सालियानचा एक मित्र होता, स्टिव्ह पिन्टो नावाचा. त्याने काही पोस्ट लिहिल्या होत्या. स्टिव्ह पिन्टोने एका पोस्टमध्ये ७ जून २०२० रोजी एकता कपूरच्या घरी एक पार्टी झाली. त्या पार्टीत दिशा सालियान, परमबीर सिंह यांच्याबाबतच उल्लेख केलेला होता. मात्र, त्या दिवसांपासून तो स्टिव्ह पिन्टो गायब झाला आहे. याबाबत स्टिव्ह पिन्टोचीही चौकशी झाली पाहिजे, तसेच तो कुठे आहे हे देखील शोधलं पाहिजे”, असा आरोप वकील निलेश ओझा यांनी केला आहे.