Disha Salian दिशा सालियनच्या मृत्यूवरुन बरेच आरोप २०२० मध्येही झाले होते आणि अधिवेशनातही हा विषय निघाला होता. दिशा सालियनच्या वडिलांनी पुन्हा एकदा कोर्टात याचिका दाखल केल्याने हा विषय चर्चेत आला होता. दरम्यान दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आल्याची माहिती समोर आली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

अरविंद सावंत काय म्हणाले?

दिशा सालियनचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला. तिचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचं समोर आलं. मी इतकंच म्हणेन की सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं. आमच्या तरुण मुलाला (आदित्य ठाकरे) तुम्ही जितका त्रास देत आहात त्याच्या वेदना त्याचे घाव आमच्याही हृदयावर होत आहेत. सज्जन मुलाचं चारित्र्यहनन केलं गेलं, कुणी केलं तर ज्यांनी त्याच्या घरचं मीठ खाल्लं त्यांनीच. असंही अरविंद सावंत म्हणाले.

दिशाच्या सालियनच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये काय?

दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झालेला नाही असं यात नमूद करण्यात आलं आहे. दिशाच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याचं आणि अनेक फ्रॅक्चर झाल्याने मृत्यू झाला आहे. डोळे, हात, पाय यांना जखमा झाल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये आहे. ११ जून २०२० ला हे पोस्टमॉर्टेम करण्यात आलं होतं. ही बातमी समोर आल्यानंतर अरविंद सावंत यांनी टीव्ही ९ शी बोलताना सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

दिशाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?

“मला याबाबत तूर्तास माहिती मिळालेली नाही. माहिती मिळाली की मी या प्रकरणाबाबत बोलेन.” अशी एका ओळीची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दिशा सालियन प्रकरण काय?

दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. तिनं आत्महत्या केली होती, असा पोलिसांनी दावा केला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना या सर्व घडामोडी घडल्यानं त्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला. त्यामध्ये दिशाच्या मृतदेहावर जखमा असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.