Disha Salian Death Case: राज्यात २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या आणि त्याची व्यवस्थापक दिशा सालियनचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरण चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. या याचिकेत दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
यानंतर राज्यात सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह दिशा सालियनच्या वडिलांच्या वकिलांनी दिशा सालियनचा मृत्यू नैसर्गिक नसून, त्यामध्ये अनेक संशयास्पद बाबी असल्याचा आरोप होता. याचबरोबर काहींनी दिशाच्या हत्येमध्ये शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरेंचा सहभाग असल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर आता दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला असून, त्यामध्ये दिशावर लैंगिक आत्याचार झाला नसल्याचे म्हटले आहे.
दिशा सालियानचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर शिवसेनेचे खासदार (उद्धव ठाकरे) अरविंद सावंत यांनी, “न्यायाला विलंब लागतो पण सत्याचाच विजय होतो. आमचा आदित्य कसा आहे हे आम्हाला ठावूक आहे”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या हृदयावर घाव होत आहेत
टीव्ही ९ या वृत्तवाहीनीशी बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, “सत्य परेशान हो सकता हैं पराजीत नही. आमच्या तरुण मुलाला तुम्ही जितका त्रास देत आहात, त्याच्या वेदना, त्याचे घाव आमच्या हृदयावरही होत आहेत. इतक्या सज्जन मुलाचे चारित्र्यहनन करणं आणि हे कुणी केलं तर त्याच्या घरचं मीठ खाल्लं त्यांनीच. चीड त्याची आहे.”
आमचा आदित्य…
ते पुढे म्हणाले की, “आहे हे स्पष्ट झाले आहे. देर आये, दुरूस्त आये. न्यायाला विलंब लागतो पण सत्याचा विजय होतो. आमचा आदित्य कसा आहे, हे आम्हाला ठावूक आहे. त्या मुलाला उभा महाराष्ट्र पाहतो. तो कसा आहे हे सर्वांना ठाऊक आहे. निर्व्यसनी मुलावर असले घाणेरडे आरोप करता. महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थरावर घेऊन गेला आहात. पण, एक आनंद आहे की, सत्य शेवटी समोर आले.”
दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करा
यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी दिशा सालियनच्या वडिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “आता मी उलट मागणी करेन की, दिशा सालियानच्या वडिलांची नार्को टेस्ट करा. पाच वर्षांनंतर त्यांना हा साक्षात्कार कसा झाला याची नार्को टेस्ट केली पाहिजे.”