राहाता : पक्ष मोठा झाला की त्यात मतभेद असतातच. मात्र, जे कायमस्वरूपी असंतुष्ट राहिले त्यांना संतुष्ट करता येत नाही. फलकबाजी कोण करतं याची दखल घेण्याची आवश्यकता नाही. श्रीरामपूर वगळता कुठेही नाराजी नाही. मात्र, त्या ठिकाणी सुद्धा ज्यांची पक्षातून हकालपट्टी केली त्यांचीच नाराजी आहे, असे स्पष्ट मत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, शुक्रवारी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना विखे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने अनेक कार्यकर्त्यांना संधी देता येत नाही. ‘हर घर चलो अभियान’ मजबूत राबवण्यासाठी संघटनेचे काम सध्या सुरू आहे. राज्यात भाजपचे विक्रमी तीन कोटींपेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली आहे. पक्षाच्या विविध समित्यांच्या नेमणुका लवकरच घेण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या.
सौर ऊर्जा प्रकल्पात महाराष्ट्र आघाडीवर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरहून अधिक जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देण्यात आली. राज्यात सौर ऊर्जेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले ते कसे केले व का केले हे मला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीर पर्यटक सुटका श्रेयवाद या प्रश्नावर बोलताना विखे म्हणाले, यामध्ये श्रेयवाद असे काही नाही. गिरीश महाजन देखील गेले ते पर्यटकांच्या सोयी सुविधेसाठी. एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्री असून आपल्यावर असलेल्या जबाबदारीमुळे ते गेले. एकमेकाला पूरक असेच काम राज्यात सुरू आहे.
राष्ट्रवादीचे खासदार नरेश म्हस्के यांच्या वक्तव्याबाबत विखे यांनी सांगितले, पहलगामची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अतिरेक्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे देखील प्रधानमंत्र्यानी सांगितले आहे. संपूर्ण देश पंतप्रधानांच्या मागे उभा असताना अशी बेताल वक्तव्य कोणी करत असेल तर ते दुर्दैव आहे.