आठवडय़ाभरापूर्वी आकारास येऊ घातलेल्या मनसे, शेकाप व जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या नव्या तिस-या आघाडीचे इंजिन गतीने पुढे धावण्याची शक्यता दिसत नाही. या आघाडीच्या नियोजित बैठकीचा मुहूर्त टळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील मनसे, शेकाप व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. घाईघाईने निर्माण झालेली आघाडी तितक्याच गतीने मावळतीकडे झुकताना दिसत आहे. दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शेकापचे संपतराव पवार व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात या आघाडीत समाविष्ट होऊ इच्छिणारे सुरेश पाटील या उमेदवाराने आघाडीवर फारसे न विसंबता स्वतंत्रपणे प्रचाराला प्रारंभ केला आहे.
राज्यात आघाडी आणि यांच्या जोडीने मनसे, शेकाप व जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या नव्या तिस-या आघाडीची चर्चा सुरू झाली होती. याबाबत गेल्या आठवडय़ात राज ठाकरे शेकापचे आमदार जयंत पाटील व जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे यांची मुंबईत बैठकही झाली होती. पश्चिम महाराष्ट्रात जनसुराज्य शक्ती व शेकाप यांची काही प्रमाणात ताकद आहे. त्याला मनसेची साथ मिळाल्याने नवी आघाडी प्रस्थापित पक्षांना आव्हान देईल असेही चित्र निर्माण झाले होते. या आघाडीची पहिली बैठक झाल्यानंतर सोमवार वा मंगळवारी दुसरी बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. तथापि दुस-या बैठकीचा मुहूर्त संपला तरी अद्याप ती होण्याची चिन्हे नसल्याने ही आघाडी मूर्त स्वरूप धारण करणार का, यावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून चालविलेली आहे. पण तिसरी आघाडी स्थापन होऊन त्याव्दारे निवडणूक लढविण्याची चिन्हे निर्माण झाल्याने ते काहीसे थांबले होते. मात्र तिसरी आघाडी स्थापन होण्याच्या दृष्टीने हालचाली दिसत नसल्याने शेकापचे कार्यकर्ते चलबिचल झाले आहेत. अशातच राज ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने जाणारे शेकापचे कार्यकर्ते बिथरले आहेत. तर शेकापला पाठिंबा देणारे माकप व भाकप या पक्षांनी आघाडीत मनसे सामिल होणार असेल तर आपला पाठिंबा राहणार नाही, अशी भूमिका घेतल्याने शेकापची गोची झाली आहे.
पन्हाळ्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे मुख्यालय आहे. तेथेही तिसरी आघाडी स्थापित करण्याबाबत फारशा हालचाली सुरू झालेल्या दिसत नाहीत. अशी आघाडी स्थापन व्हायची असेल तर निवडणुकीच्या आधी किमान महिना दोन महिना चर्चा, बैठका होणे गरजेचे असते. तसे न होता ऐन निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने आघाडी स्थापन झाल्याने तिचा ‘अजेंडा’ नेमका काय असावा याबाबत स्पष्ट भूमिका घेणे कठीण बनले आहे.
राज ठाकरे हे शेकाप व जनसुराज्य शक्ती पक्षाला किती प्रमाणात विश्वासात घेऊन आघाडीचा कारभार करतात याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. आघाडीतील या दोन प्रमुख घटकांना विचारातच न घेता मनसेने लोकसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले. परिणामी जनसुराज्य शक्ती व मनसेच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता तर जनसुराज्य शक्ती पक्ष लोकसभा न लढविण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. या पक्षाच्या दृष्टीने आघाडीचा विषय मागे पडल्याचे दिसत असून ते लोकसभा निवडणुकीसाठी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष वेधले आहे.
तिस-या आघाडीचे ‘इंजिन’ रखडल्याने शेकाप, ‘जनसुराज्य’मध्ये नाराजी
आठवडय़ाभरापूर्वी आकारास येऊ घातलेल्या मनसे, शेकाप व जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या नव्या तिस-या आघाडीचे इंजिन गतीने पुढे धावण्याची शक्यता दिसत नाही. या आघाडीच्या नियोजित बैठकीचा मुहूर्त टळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील मनसे, शेकाप व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 13-03-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Displeasure in pwp and jansurajya