रत्नागिरी : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्या घरी आणि हॉटेलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकून त्यांच्यासह त्यांच्या पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा गुन्हा दाखल केला.
रत्नागिरी विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह सुमारे २० अधिकारी-कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले. त्याचबरोबर रायगडच्या लाचलुचपत विभागाचेही काही अधिकारी येथे दाखल झाले आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यानंतर लाचलुचपत विभागाचे पथक आमदार साळवी यांच्या बंगल्यासह सात विविध ठिकाणी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रे आणि इतर वस्तूंची तपासणी चालू होती.
हेही वाचा >>> राजन साळवींच्या घरावर ‘एसीबी’ची धाड, सूरज चव्हाणांना ‘ईडी’कडून अटक; आदित्य ठाकरे भाजपावर टीका करत म्हणाले…
आमदार साळवी यांनी ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत रत्नागिरी शहर हद्दीत आणि जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी सुमारे तीन कोटी ५३ लाख ८९ हजार ७५२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतचे समाधानकारक स्पष्टीकरण त्यांनी सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यासह पत्नी आणि मुलगा यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.
आमदार साळवी व कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजताच रत्नागिरीसह राजापूर, लांजा, चिपळूण तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी साळवींच्या घरी जमा झाले. ठाकरे गटाचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईकही रत्नागिरीकडे रवाना झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोन वेळा फोन केला आणि घटनेची माहिती घेऊन धीर दिल्याचे साळवी यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार साळवी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने केलेल्या या कारवाईचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.
मी चूक केली नाही, मी दोषी नाही, त्यामुळे मी अटकपूर्व जामीन घेणार नाही. त्यांनी अटक करावी, माझी पोलीस कोठडीत राहण्याची तयारी आहे. कितीही दबाव आणला तरी मी उद्धव ठाकरेंबरोबरच राहणार. – राजन साळवी, आमदार