सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे व मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. यात वाळू वाहतुकीमुळे खराब होणाऱ्या रस्त्यांच्या प्रश्नावर आमदार कदम यांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात उद्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचे ठरविले असतानाच वाळू तस्करी रोखण्याच्या कारणावरून एका तलाठय़ाला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी आमदार कदम यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तर याउलट, वाळू माफियांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करीत आमदार कदम यांनी या प्रकरणी आपण जिल्हाधिकारी मुंडे व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांच्याविरुद्ध अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
जिल्हा प्रशासनाने अलीकडेच जिल्ह्य़ातील वाळू साठय़ांचा लिलाव केला असून त्यानुसार वाळू उपसा तथा वाहतूक सुरू झाली आहे. परंतु या वाळू वाहतुकीमुळे रस्ते मोठय़ा प्रमाणात खराब झाल्याचा आक्षेप घेत अगोदर रस्ते दुरुस्त करावेत आणि मगच वाळू वाहतूक करावी, अशी मागणी आमदार रमेश कदम यांनी लावून धरली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार कदम यांनी उद्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचे ठरविले आहे. हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी त्यांनी मोहोळ-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात गावोगावी वाळू माफिया व प्रशासनाच्या विरोधात जनजागृतीचे फलक झळकावले आहेत. प्रशासनाचा मनमानी कारभार चालणार नाही, अगोदर रस्ते आणि मगच वाळू वाहतूक, अशी ठोक भूमिका घेत आमदार कदम यांनी हाती घेतलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सजग झाले आहे.
या पाश्र्वभूमीवर काल पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा होत असताना आमदार कदम हे त्याठिकाणी गेले व वाळू उपसा तथा वाहतूक बंद पाडली. त्यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला कळवून घटनास्थळी येण्यास कळविले होते. त्यानुसार तलाठी म.हनीफ हुसेन तांबोळी (५०) हे आले असता त्यांना आमदार कदम यांनी जाब विचारत मारहाण केल्याची तक्रार पुढे आली. ही बाब जिल्हाधिकारी मुंडे यांच्या कानावर जाताच त्यांनी या संदर्भात आमदार कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्यानुसार तलाठी तांबोळी यांची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्यात आली.
या कारवाईमुळे आमदार कदम हे संतापले असून त्यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. मुंडे हे लोकप्रतिनिधींचा अपमान करतात. वाळू उपसा व वाहतुकीशी संबंधित उपजिल्हाधिकारी शंकर जाधव व तहसीलदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना वाळू तस्करीत प्रशासकीय यंत्रणेत साखळी तयार झाल्याचा व यात जिल्हाधिकारी मुंडे हे भ्रष्ट यंत्रणेला पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार कदम यांनी केला. पोलीस अधीक्षक मंडलिक हे माझी फिर्याद घेण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचा सल्ला देतात. त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वरिष्ठ अधिकारी एखाद्या मागासवर्गीय लोकप्रतिनिधीला जाणीवपूर्वक तुच्छतेची वागणूक देत असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार कदम व जिल्हाधिकारी मुंडे यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता. लोकप्रतिनिधींनी बोलावलेल्या कोणत्याही बैठकीस अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा आदेश जिल्हाधिकारी मुंडे यांनी शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन दिला होता. त्यावर आमदार कदम यांनी जोरदार आक्षेप घेऊन जिल्हाधिकारी मुंडे यांच्या विरोधात राज्य विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर आता पुन्हा वाळू उपसा व वाहतुकीच्या प्रश्नावर त्यांची चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. या संदर्भात जिल्हाधिकारी मुंडे यांनी, शासनाच्या निर्णयानुसारच आपण कारभार करीत असून वाळू उपसा व वाहतुकीमुळे गावातील रस्ते खराब होत असतील तर आमदार कदम यांनी शासन दरबारी धोरण बदलून आणावे. म्हणजे त्यानुसार कार्यवाही करता येईल. मात्र प्राप्त परिस्थितीत कोणी कितीही मोठा असला तरी त्यास कायदा हातात घेता येणार नाही, असा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा