सातारा: महाबळेश्वर पालिका व महावितरणमध्ये वसुलीवरून वादावादी झाल्याचा प्रकार समोर आला. महावितरणने पालिकेचा वीजपुरवठा खंडित करताच पालिकेने विद्युत मंडळ कार्यालय सील केले. महाबळेश्वर पालिकेकडे मागील काही महिन्यांपासून विद्युत मंडळाची लाखांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीचे कारण देत पालिकेने शहरात लावलेल्या चार डिजिटल फलकांचा विद्युत पुरवठा बंद केला. सर्व पैसे भरून देखील विद्युत पुरवठा खंडित केल्याने पालिका व विद्युत मंडळामध्ये वादावादीस सुरुवात झाली.
विद्युत मंडळाने थेट पालिकेचा बोटक्लब, प्रवासी व प्रदूषण कर नाके, एसटीपी आदींचा वीजपुरवठा देखील खंडित केल्याने वाद वाढला. विद्युत मंडळाकडे देखील पालिकेची कर थकबाकी असल्याने ही थकबाकी न भरल्याचे कारण देत पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्या सूचनेने कर निरीक्षक अमित माने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी विद्युत मंडळाचे कार्यालय सील करून पाणी बंद केले. या कारवाईस प्रत्युत्तरादाखल पुन्हा एकदा विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर वीज वितरण विभागाने आपली सर्व थकबाकी पालिकेकडे भरली. पालिकेनेदेखील साधारण पंधरा लाख रुपये वीज वितरण विभागाकडे जमा केले. साधारण दोन ते तीन तास हा प्रकार सुरू होता. विद्युत मंडळाने भरलेली थकबाकी पालिकेच्या खात्यात जमा झाल्याचे दिसत नसल्याने पालिका वीज वितरण विभागाचे सील काढण्यास तयार होत नव्हती तर दुसरीकडे पंधरा लाख रुपये भरून देखील वीज वितरण विभाग पालिकेचा वीजपुरवठा सुरू करण्यास तयार नव्हते. अशातच या कार्यालयाच्या बाजूलाच २०१९ साली उभारण्यात आलेल्या ३३ केव्हीची कोळी अळी उपकेंद्राची इमारत परवानगी न घेता बांधली असल्याची माहिती पालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासक पाटील यांना दिली. त्यानंतर ती इमारतदेखील सील करण्याचे आदेश कर निरीक्षक अमित माने यांना देत कर्मचारी राहत असलेले कर्मचारी निवास देखील सौल करण्याचा निर्णय घेतला. या वादाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली.
हा वाद थेट जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यापर्यंत गेला. जिल्हाधिकारी पाटील व जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी पालिका प्रशासक योगेश पाटील यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली. पाटील यांनी विद्युत मंडळाने केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. दरम्यान, नागरिकांना त्रासाला सामोरे जाऊ लागू नये या उद्देशाने लोकहिताची भूमिका घेत पालिका प्रशासक योगेश पाटील व विद्युत मंडळाचे चेत्रा रेड्डी यांनी एक पाऊल मागे येण्याची तयारी दर्शवली. अखेर पालिकेने वीज वितरण विभागाच्या कार्यालयाला लावलेले सील काढले तर वीज वितरण विभागाने देखील पालिकेचा खंडित केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरू केला व हा पेच सुटला.