सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच जुंपलेली दिसत आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी भर सभेत पाटलाच्या पोराला लग्नाआधीच पोरं होत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी राजन पाटलांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
उमेश पाटील म्हणाले, “राजन पाटलांची दोन पोरं प्रचारात आहेत. त्यांनी सांगितलं की, आमच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं झालेली आहेत. एवढंच नाही, तर भरसभेत याचा आम्हाला अभिमान आहे, असंही त्यांनी सांगितलं.”
“स्वतःच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं झाली सांगणारा विकृत”
“स्वतःच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं झाली आहेत असं सांगणारा हा असंस्कृत विकृत मनोवृत्तीचा माणूस हा भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का?” असा सवाल उमेश पाटील यांनी सभेत उपस्थितांना केला.
व्हिडीओ पाहा :
“…की बापच पोरांच्या नावाने बिलं फाडत होता”
उमेश पाटील पुढे म्हणाले, “हा एकप्रकारे महिलांचाही अपमान आहे. राजन पाटलांनी आणखी असंही सांगितलं की, लग्नाच्या आधी झालेली मुलं तुमच्या वयाची असतील असंही म्हटलं. म्हणजे यांची लग्नं साधारण २४-२५ व्या वर्षी झालं असेल. त्याआधी १८ पासून सुरू झालं असेल तर १५-२० झाली असतील. त्यांनी बाळात्यातच सुरू केलं होतं की बापच पोरांच्या नावाने बिलं फाडत होता काय माहिती.”
हेही वाचा : “पाटलाच्या पोराला लग्नाच्याही आधी यांच्याएवढी पोरं…”, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
“असा नेता भीमा कारखान्याच्या बोकांडी चालेल का?”
“मोहळच्या जनतेच्या सहनशीलतेची मलाच किव येत आहे. असला नेता मोहोळ तालुक्याने तीनवेळा निवडून दिला. असला नेता मोहोळ तालुक्याच्या बोकांडी बसला. हा असला घाणेरडा विकृत मनोवृत्तीचा माणूस मोहोळ तालुक्यात असेल तर तालुक्याचे म्हणून घ्यायला आम्हाला लाज वाटेल. पाटील म्हणून घ्यायची लाज वाटले. लाज वाटेल असा नेता भीमा कारखान्याच्या बोकांडी चालेल का?” असा प्रश्न उमेश पाटलांनी उपस्थितांना विचारला.